
बालवयात लहान मुले खेळताना अनेकदा अनावधानाने काही वस्तू तोंडात टाकतात आणि त्यातून मोठ्या दुर्घटना घडतात. असाच एक धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात समोर आला आहे. येथे एका आठ वर्षांच्या बालकाने खेळता खेळता काचेचा गोट (कंचा) थेट गिळल्याची घटना घडली.
सुदैवाने, चंद्रपूरमधील पोटविकार तज्ज्ञ डॉ. राहुल सैनानी यांनी कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता, अवघ्या दोन मिनिटांत ‘एंडोस्कोपी’च्या साहाय्याने हा गोट सुखरूप बाहेर काढला असून, त्या बालकाला मोठा दिलासा मिळाला आहे.वरोरा येथे आठ वर्षीय दक्ष मोहिते घरात खेळत असताना २ जून रोजी काचेची कंची गिळली. ही बाब त्याने आई-वडीलांना सांगितली. शौचा वाटे तो गोट बाहेर निघून जाईल या आशेने कुटुंबीयांनी तीन दिवस वाट पाहिली.
मात्र, तीन दिवस उलटूनही तो गोट बाहेर न निघाल्याने आणि बालकाला त्रास जाणवू लागल्याने ५ तारखेला कुटुंबीयांनी पोटविकार तज्ज्ञ डॉ, राहुल सैनानी यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर बालकाच्या पोटाची तपासणी केली व डॉक्टरांनी कोणतीही चिरफाड किंवा शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘एंडोस्कोपी’द्वारे उपचार सुरू केले.
अत्यंत कौशल्याने आणि काळजीपूर्वक कोणतीही सुरी-कात्री न वापरता अवघ्या १ ते २ मिनिटांच्या आत तो काचेचा गोट बालकाच्या पोटातून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आला. डॉक्टरांनी अत्यंत वेगाने आणि अचूकपणे ही प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतरही बालकाला कोणताही त्रास झाला नाही. सध्या चिमुरड्याची प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या या यशस्वी आणि जलद उपचारांमुळे पालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.



























































