संगमेश्वरच्या जंगलात रॉयल बंगाल टायगर! 18 वर्षानंतर झाले पहिल्यांदाच दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 18 वर्षांच्या सातत्यपूर्ण संवर्धन आणि जंगल पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांतून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये एका खासगी मालकीच्या जंगलात रॉयल बंगाल वाघाचे दर्शन घडले आहे. जंगलात बसविण्यात आलेल्या गुप्त कॅमेरा ट्रॅपमध्ये हा दुर्मिळ क्षण कैद झाला.

तालुक्यातील सह्याद्रीच्या वन क्षेत्रात गेली अनेक वर्षे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे काम सुरु आहे. यासाठी बफरझोन, वनभागात छुपे कॅमेरे लावणे अशा कामामुळे वाघाचे अस्तित्व वाढत आहे. अशातच कोयना अभयारण्यात पट्टेरी वाघ सोडण्यात आल्यामुळे वाघाची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. या प्रयत्नांचे फळ म्हणून आता या परिसरात रॉयल बंगाल वाघाची उपस्थिती नोंदवली गेली आहे. कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंद झालेल्या या घटनेमुळे वन्यजीवप्रेमी आणि संवर्धन क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघ नेमका रत्नागिरी जिल्ह्यातील एईआरएफ (Applied Environmental Research Foundation) च्या संवर्धन करारांतर्गत जतन करण्यात आलेल्या खासगी जंगलात आढळल्याचा उल्लेख आहे. मात्र सुरक्षेच्या आणि वन्यजीव संवर्धनाच्या कारणास्तव गाव किंवा अचूक स्थान जाहीर करण्यात आलेले नाही.

अशा प्रकारचा वाघ आढळून आल्याने आता वन संवर्धनाची जबाबदारी अधिक वाढली आहे. सह्याद्रीचा वन पट्टा असो अथवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यामध्ये असणाऱया वनराईचे आता जतन होणं महत्त्वाचे आहे. असं झालं तरंच येथील वाघाची संख्या वाढण्यास मदत होईल.

प्रतीक मोरे, सृष्टी ज्ञान संस्था, संगमेश्वर-देवरुख