ठसा – मिठू मुखर्जी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप ठाकूर

प्रादेशिक भाषेतील चित्रपटांतून यशस्वीपणे वाटचाल सुरू असताना आपण हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकावे आणि अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत असा सकारात्मक दृष्टिकोन असलेले कलाकार अनेक. त्यातील काहींना हिंदी चित्रपटसृष्टीत पाय रोवून उभे राहणे शक्य झाले, तर काहींनी तीन-चार हिंदी चित्रपटांत भूमिका साकारल्यावर पुन्हा आपल्या प्रादेशिक भाषेतील चित्रपटात भूमिका साकारण्यास प्राधान्य दिले.

मिठू मुखर्जी याच पठडीतील अभिनेत्री. तिने बंगाली चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले तेव्हाच राखी, मौशमी चटर्जी यांनी एक-दोन बंगाली चित्रपटात भूमिका साकारल्यावर मुंबईत येऊन हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आणि आपली हिंदीतील वाटचाल आकाराला आणली, पण चित्रपटाच्या जगात एकाचे यशाचे समीकरण दुसऱया कलाकाराला लागू होईलच असे अजिबात नाही.

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील बंगाली चित्रपटसृष्टीत अतिशय उत्तम वाटचाल सुरू असतानाच मिठू मुखर्जीने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले, पहिलाच चित्रपट मिळाला तो शत्रुघ्न सिन्हाचे सेव्रेटरी पवनकुमार योगी निर्मित आणि दुलाल गुहा दिग्दर्शित ‘खान दोस्त’ (1976). या चित्रपटात ती शत्रुघ्न सिन्हाची नायिका होती, पण हा चित्रपट मानवतावादी पोलीस झालेला  राज कपूर आणि त्याला गोड बोलून आपलासा करून तुरुंगातून पलायन केलेला गुन्हेगार शत्रुघ्न सिन्हा या दोन व्यक्तिरेखांभोवती होता. त्यात मिठू मुखर्जीला वाव तो काय मिळणार? सुभाष घई यांनी आपले सहकारी भल्ला यांच्यासोबत या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. रसिकांनी या चित्रपटाला पूर्णपणे नाकारल्याने मिठू मुखर्जीची हिंदी चित्रपटसृष्टीतील वाटचाल अवघड ठरली. सत्तरच्या दशकात दिग्दर्शक बासू चटर्जी मोठ्या प्रमाणावर चित्रपट पडद्यावर आणत होते. त्यांच्या ‘सफेद झूठ’ (नायक विनोद मेहरा), ‘दो लडके दोनो कडके’ (नवीन निश्चलसोबत) तिला भूमिका मिळाली. त्यांच्याच दिग्दर्शनातील  ‘दिल्लगी’ या चित्रपटात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका असताना मिठू मुखर्जीला छोटी भूमिका मिळाली. तत्कालिक चित्रपट मासिकांतून तिने भरपूर प्रसिद्धी मिळवली, पण फार काही साध्य न झाल्याने ती पुन्हा बंगाली चित्रपटांत भूमिका साकारू लागली. ‘खान दोस्त’ हा चित्रपट अधूनमधून मॅटिनी शोला प्रदर्शित व्हायचा आणि ‘ही मिठू मुखर्जी सध्या काय करतेय?’ असा प्रश्न हिंदी चित्रपटाच्या रसिकांना पडे.

मिठू मुखर्जीने बंगाली चित्रपटांतील आपल्या कारकीर्दीला सुरुवात 1971 च्या चित्त बोस दिग्दर्शित ‘शेष परबा’ या चित्रपटाच्या माध्यमातून केली. तिच्या कारकीर्दीतील महत्त्वाचे बंगाली चित्रपट म्हणजे ‘स्वयंसिद्धा’, ‘प्रतिमा’, ‘मौचक’ हे आहेत. ती बंगाली चित्रपटांत स्थिर होत असतानाच हिंदी चित्रपटसृष्टीत आली आणि बंगाली चित्रपटांत परतली तरी तिला बंगाली चित्रपटांत भूमिका मिळाल्या. उत्तम कुमार हे बंगाली चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार. त्यांच्या सोबतचा मिठू मुखर्जीचा’ ‘चंदर कछकली’ हा बंगाली चित्रपट व्यावसायिकदृष्टय़ा अपयशी ठरला आणि मिठू मुखर्जीची व्यावसायिक घसरण सुरू झाली. एव्हाना बंगाली चित्रपटांत अपर्णा सेन, रूपा गांगुली अशा नवतारकाचे युग आले होते. मिठू मुखर्जीने दिनेश जुन्ना दिग्दर्शित ‘ज्वेन कुआ’ या ओडिया चित्रपटातही भूमिका साकारली, तर तिची भूमिका असलेला ‘आश्रिता’ (1990) हा चित्रपट निर्मिती अवस्थेत पाच वर्षे रखडला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिठू मुखर्जीने आपल्या खासगी आयुष्याला प्राधान्य दिले. आपल्या अभिनय कारकीर्दीला पूर्णविराम देण्यासाठी हीच वेळ योग्य आहे असे तिने मानले. अलीकडच्या काळात ती मुंबईत राहत होती आणि वयाच्या 71 व्या वर्षी तिचे मुंबईतील एका इस्पितळात नुकतेच निधन झाले.