
सोशल मीडियावरील अज्ञात लिंक अथवा फाईल्स डाऊनलोड करणे किती धोक्याचे ठरू शकते, याचा प्रत्यय देवरूख परिसरात आला आहे. इन्स्टाग्रामवरून आलेली एक संशयास्पद एपीके फाईल डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल हॅक करून एका 21 वर्षीय तरुणाच्या बँक खात्यातून तब्बल 55 हजार 599 रुपयांची रक्कम परस्पर लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साडवली साईनगर (ता. संगमेश्वर) येथील रहिवासी कौस्तुभ संतोष सोमण (21) हा 7 सप्टेंबर 2026 रोजी महाविद्यालयात लिंकडीनचे सत्र चालू असताना उपस्थित होता. दुपारी 11 च्या सुमारास त्याच्या मोबाईलवरील इन्स्टाग्राम ॲपवर एका अनोळखी व्यक्तीकडून एपीके फाईल प्राप्त झाली. ती फाईल डाऊनलोड केल्यानंतर त्याचा मोबाईल संशयास्पदरीत्या त्या दिवशी चार ते पाच वेळा अचानक बंद पडू लागला. दुसऱ्या दिवशी 8 सप्टेंबर रोजी दुपारी त्याचा फोन पुन्हा बंद पडला. त्याने तो सुरू केल्यानंतर त्याच्या गुगल पे खात्यातून परस्पर 55 हजार 599 रुपये अज्ञात आरोपीच्या युपीआय आयडीवर वळते करण्यात आले.
आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कौस्तुभने देवरूख पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. कौस्तुभच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. देवरूख पोलीस पुढील तपास करत आहेत.




























































