मतचोरी विरोधात महाविकास आघाडीचा ७ ऑक्टोबरला चिपळूणमध्ये महामोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसआयआरचीयादी जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात आगडोंब उसळला आहे. याला कारणीभूत निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयुक्तांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. एसआयआरमध्ये नाव आलेल्या मतदारांना नोटिसा पाठवून त्यांच्याकडे पुरावे मागितले जात आहेत. त्यासाठी १३ प्रकारची कागदपत्रे मागितली जात आहेत. हे पुरावे सादर केल्यानंतर, ‘तुमच्या आणि तुमच्या वडिलांच्या वयात एवढा फरक कसा?’ असे प्रश्न विचारले जात आहेत. हे पुरावे आम्ही का द्यायचे? चुका तुम्ही किंवा बीएलओने केल्या असतील, तर त्या तुम्हीच दुरुस्त करा. प्रत्येक मतदान केंद्रातील ५०-५० मतदारांना नोटिसा पाठवून त्यांची नावे रद्द करण्याचा म्हणजेच मतचोरी करण्याचा डाव आखला गेला आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे चोर आहेत. या मतचोरीविरोधात ७ ऑक्टोबरला चिपळूणमध्ये महाविकास आघाडी मोर्चा काढणार असल्याचे शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी आज चिपळूण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी आमदार भास्कर जाधव म्हणाले की, देशात काही संस्था या स्वायत्त आहेत. त्यामध्ये निवडणूक आयोगाचा समावेश होतो. या संस्थांच्या प्रमुखांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊ नयेत आणि राजकीय पक्षांचा अजेंडा राबवू नये, अशी अपेक्षा असते. मात्र पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून स्वतंत्र एसआयआर कार्यक्रम राबविण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये ८९ लाख मतदारांची नावे कमी करण्यात आली. त्यापैकी ३७ लाख मतदारांनी ‘आमची नावे का कमी केली?’ याबाबत विचारणा केली, तेव्हा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी नागरिक मतदार म्हणून घुसवले, असा फेक नॅरेटिव्ह पसरवण्यात आला. महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्ये मंजूर झाले असताना आणि पाच राज्यांच्या निवडणुका सुरू असताना, केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आणि त्यामागे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणून ‘विरोधी पक्ष महिला आरक्षणाला विरोध करत आहे’ असे वातावरण देशात निर्माण केले. त्यावेळी निवडणूक आयोगाने त्यांना का थांबवले नाही? असा सवाल आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.

आज महाराष्ट्रात २ कोटी ६ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ज्यांची नावे एसआयआरच्या यादीत समाविष्ट झाली आहेत, त्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यांच्याकडून १३ प्रकारचे पुरावे मागितले जात आहेत. हे पुरावे आम्ही कसे देणार? प्रत्येक मतदान केंद्रावरील ५०-५० मतदारांना नोटिसा पाठवून त्यांची नावे कमी करण्याचा घाट घातला गेला आहे. माझ्या मतदारसंघात ३२२ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येकी ५० मतदार पकडले, तर १६ हजार मतदार एका फटक्यात कमी करण्याचा हा डाव आहे, असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, काँग्रेसचे भरत लब्धे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अविनाश खेडस्कर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुभाष जाधव, सचिन बाईत, बळीराम गुजर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.