Mega Block – मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, हार्बर आणि ट्रान्स-हार्बरवरील लोकलसेवा रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी 4 ऑक्टोबर 2026 रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल. तसेच पनवेल ते वाशी दरम्यानच्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

घाटकोपर येथून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ व भायखळा स्थानकांवर थांबतील.

पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर लाईनवरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या (अप) ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 या वेळेत आणि ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या (डाऊन) ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 या वेळेत रद्द राहतील.

ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी मार्गावर विशेष उपनगरीय रेल्वे सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा उपलब्ध असतील. ब्लॉकच्या कालावधीत पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.