वेब न्यूज – आकाशगंगांमध्ये सापडल्या 84 रहस्यमय वस्तू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन 

नासाच्या चंद्रा क्ष-किरण दुर्बिणीने विश्वात एका नव्या प्रकारच्या रहस्यमय वस्तूंचा शोध लावला आहे. या वस्तू अतिशय कमी ऊर्जेचे क्ष-किरण सोडतात. मात्र त्यातून मोठ्या प्रमाणात अतिनील किरणे बाहेर पडत असल्याचे आढळले आहे. संशोधकांनी त्यांना ‘हायपरसॉफ्ट एक्स-रे सोर्सेस’ असे नाव दिले आहे. या शोधामुळे खगोलशास्त्रातील दोन जुन्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संशोधकांनी चंद्राच्या संग्रहातील माहिती तपासताना सहा वेगवेगळ्या आकाशगंगांमध्ये अशा तब्बल 84 वस्तू शोधल्या. त्यापैकी अँड्रोमेडा आणि पिनव्हील या दोन सर्पिल आकाशगंगा आहेत, तर उर्वरित चार आकाशगंगा लंबवर्तुळाकार आहेत. या वस्तू ताऱयांची निर्मिती सुरू असलेल्या भागात तसेच जुन्या ताऱयांच्या परिसरातही आढळल्या. या वस्तूंचे वैशिष्ट्य म्हणजे त्या चंद्राच्या क्ष-किरण चित्रांमध्ये केवळ कमी ऊर्जेच्या भागात दिसतात आणि जास्त ऊर्जेच्या क्ष-किरणांमध्ये गायब होतात. त्यामुळे त्या सामान्य क्ष-किरण स्रोतांपेक्षा वेगळ्या असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या वस्तू नेमक्या काय आहेत, हे अद्याप निश्चित नाही. संशोधकांच्या मते त्यामध्ये पृष्णविवर, न्यूट्रॉन तारा किंवा पांढरा बटू तारा असण्याची शक्यता आहे. एखादा तारा साथीदार ताऱयाकडून पदार्थ खेचत असावा आणि तो पदार्थ तापल्यामुळे क्ष-किरण निर्माण होत असावेत. या शोधाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. काही पांढरे बटू तारे पुढे स्फोट होऊन ‘टाइप आयए सुपरनोव्हा’ निर्माण करू शकतात. विश्वाचा विस्तार वेगाने होत असल्याचा शोध लावण्यात अशा सुपरनोव्हांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे या रहस्यमय वस्तूंचा अभ्यास अशा स्पह्टांपूर्वीच्या ताऱयांना ओळखण्यास मदत करू शकतो. याशिवाय या वस्तूंमधून बाहेर पडणाऱया अतिनील किरणांचा वायूवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ताऱयांची निर्मिती कशी होते, याचे गूढ उलगडण्यासही मदत मिळू शकते. आतापर्यंत या वस्तू दिसल्या नव्हत्या. कारण त्यांचे कमी ऊर्जेचे क्ष-किरण शोधणे कठीण होते. विश्वातील हा लपलेला भाग शास्त्रज्ञांच्या नजरेस आला आहे.