
धाराशीवच्या खानापूरमध्ये पुन्हा एकदा कर्जबाजारी झालेल्या 35 वर्षीय तरुण शेतकऱयाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. दयानंद राठोड असे या शेतकऱयाचे नाव असून त्याने घरातील सोने विकून सोयाबीनचे पीक लावले होते. सर्व पीक करपून गेले आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर साचला. निराश आणि हतबल झालेल्या दयानंद यांनी कर्जाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले.
या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून ठिय्या आंदोलन करत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला. मृत शेतकऱ्यावर अंत्यविधी झाल्यानंतर कोणीही विचारत नाही. याची जिल्हाधिकाऱयांना जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन केल्याचे सांगत नातेवाईकांनी टाहो फोडला. बँकेचे व सावकाराचे देणे आणि कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा या विवंचनेत अडकलेले दयानंद प्रचंड नैराश्यात होते. त्यांनी राहत्या घरातच जीवन संपवले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाचा एकमेव आधार हरपल्याने राठोड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
फक्त दौरे आणि आश्वासन
गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी दौरे करून पाहणी केली, आश्वासने दिली. दौऱ्यानंतर पंचनामे सुरू आहेत अशी कारणे मिळाली. मात्र शेतकऱयांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत कधी जमा होणार? अजून किती शेतकऱयांच्या बळींची प्रशासन वाट पाहणार आहे, असा संताप व्यक्त करत राठोड कुटुंबाला तत्काळ मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


























































