
दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आज पुन्हा भाजप सरकारविरोधात उद्रेक झाला. पोलिसांची बंदी झुगारून देशाचे घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात हजारो विद्यार्थी, तरुण व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. दिवसभरात 1100 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, ‘ही केवळ सुरुवात आहे, हा लढा सुरूच राहील,’ असा इशारा आंदोलकांनी सरकारला दिला.
निवडणूक आयोगातील बंडाळीनंतर मतचोरीवर शिक्कामोर्तब झाले आहे. मतदार यादी फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रिया राबवताना ज्ञानेश कुमार यांनी मनमानी निर्णय घेतल्याचे आक्षेप आयोगातील अन्य दोन आयुक्तांनी नोंदवले आहेत. त्याचा तपशील समोर आल्यामुळे ज्ञानेश कुमार वादात सापडले आहेत. ज्ञानेश हेच मतचोरी व निवडणूक घोटाळय़ाचे मास्टरमाइंड असून सरकारच्या इशाऱयावर सगळे काही करत असल्याचा विरोधकांचा व देशातील स्वयंसेवी संस्थांचा आरोप आहे.
ज्ञानेश कुमार गेल्याशिवाय निवडणूक घोटाळे थांबणार नाहीत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी विरोधकांची मागणी आहे. याच मागणीसाठी विविध राजकीय पक्षांसह ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनांनी जंतर मंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. त्यानंतरही विरोधी पक्ष व विद्यार्थी संघटना आंदोलनावर ठाम होत्या. त्यामुळे सकाळपासून शेकडो विद्यार्थी व तरुण ज्ञानेश कुमार व सरकारचा धिक्कार करणारे फलक घेऊन मोठय़ा संख्येने जंतर मंतरच्या दिशेने निघाले होते. पोलिसांनी त्यांना अडवल्यामुळे झटापट झाली. शेकडो विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, आयसाची अध्यक्ष नेहा बोरा, खासदार संजय सिंह, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी यांनाही उचलून व्हॅनमध्ये काsंबण्यात आले.
आंदोलनाच्या परवानगीची गरजच काय?
आम आदमी पक्षाचे नेतेही आंदोलनात उतरले होते. जंतर मंतरवर आंदोलनाला परवानगी नसल्याचे सांगून पोलिसांनी त्यांना रोखले. त्यावर जंतर मंतर हे आंदोलनासाठी राखीव असलेले ठिकाण आहे. तिथे आंदोलनासाठी परवानगीची गरज काय, असा सवाल ‘आप’च्या नेत्यांनी केला. शिवाय, आम्ही आठवडाभर आधीच आंदोलनाची कल्पना पोलिसांना दिली होती, असे त्यांनी निदर्शनास आणले, मात्र पोलिसांनी काहीही न ऐकता ‘आप’च्या अनेक नेत्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांची दडपशाही, मेट्रो स्टेशन्स बंद
ज्ञानेश कुमारविरोधी आंदोलन दडपण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली होती. दिल्लीत बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपीच्या जवानांसह सुमारे पाच हजार पोलिसांचा फौजफाटा होता. दिल्लीतील 12 मेट्रो स्टेशनांचे दरवाजे बंद करण्यात आले होते. जंतर मंतरवर जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी अडथळे उभारण्यात आले होते. हे अडथळे पार करून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आंदोलन थांबणार नाही!
हजारो आंदोलकांना अटक केल्यानंतरही विद्यार्थी व तरुण आंदोलनावर ठाम आहेत. ‘पोलीस जे काही करत आहेत ती लोकशाही नाही. आम्हाला ताब्यात घेऊन हे आंदोलन थांबेल असे पोलिसांना वाटत असेल तसे होणार नाही. ही फक्त सुरुवात आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे,’ असा इशारा विद्यार्थी नेत्यांनी दिला.































































