
निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सामान्य लोकांचे मतदान हक्क हिरावले जात आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही तुरुंगात जाण्यासही तयार आहोत,” असा घणाघात काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर ते शुक्रवारी माध्यमांशी बोलत होते.
वेणुगोपाल यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “ही काँग्रेस, इंडिया आघाडी आणि सर्व विरोधी पक्षांसाठी करो या मरोची लढाई आहे. सामान्य माणसाचे मत वाचवण्यासाठी आणि देशाची लोकशाही टिकवण्यासाठी हा संघर्ष आहे. निवडणूक आयोगाचा वापर करून मोदी आणि शहा लोकांचे हक्क हिरावून घेत आहेत. आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही.”
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या मागणीसाठी देशभरात निदर्शने सुरू आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क येथे सीजेपी आणि इतर सामाजिक संघटनांनी एसआयआर प्रक्रियेतील गैरव्यवहारांच्या विरोधात आंदोलन केले. तर दिल्लीत जंतरमंतर येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) सह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निदर्शने केली. यावेळी आपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांच्यासह अनेक नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना वेणुगोपाल म्हणाले, “आज अटक झाली? होय. येणाऱ्या काळात आणखी अटकसत्र होईल. पण लोकशाही वाचवण्यासाठी आमचे सर्व नेते आणि आम्ही तुरुंगात जाण्यास तयार आहोत. त्यांनी आम्हाला भरण्यासाठी सर्व तुरुंग तयार ठेवावेत.”



























































