लेख – ‘हुती’ हल्ल्यांचे जागतिक व्यापारावर परिणाम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

येमेनमधील हुती चळवळ सुरुवातीला केवळ एक स्थानिक बंडखोरी म्हणून उदयास आली होती. मात्र आज ती मध्यपूर्वेतील सर्वात गंभीर सामरिक आणि आर्थिक संकटांपैकी एक बनली आहे. रेड सी (लाल समुद्र) आणि बाब-अल-मंदेब या अत्यंत महत्त्वाच्या सामुद्रधुनीवर हुती बंडखोरांकडून होणाऱया हल्ल्यांचे सौदी अरेबिया, पाकिस्तान, युरोप आणि संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. जगातील सुमारे 12 टक्के सागरी व्यापार आणि मोठ्या प्रमाणावरील आंतरराष्ट्रीय ऊर्जा वाहतूक याच सागरी मार्गाने होते. त्यामुळे येमेनमधील या अंतर्गत संघर्षाची झळ आता जागतिक पातळीवर तीव्रतेने जाणवत आहे.

सौदी अरेबिया हा सुरुवातीपासूनच येमेनमधील हुती बंडखोरांच्या क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांचे प्रमुख लक्ष्य राहिला आहे. सौदीतील लष्करी तळ, महत्त्वपूर्ण तेलशुद्धीकरण केंद्र, रेड सीवरील प्रमुख बंदरे यांवर सतत आक्रमणाचा धोका बनून राहिला आहे. त्यामुळे देशाच्या हवाई संरक्षण व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. हुतींनी अनेकदा हे सिद्ध केले आहे की, ते सौदी अरेबियाच्या अंतर्गत भागात खोलवर जाऊन अचूक हल्ले करू शकतात.

सौदीची अर्थव्यवस्था ही मुख्यत्वे तेल उत्पन्नावर आधारित आहे. हुतींच्या कारवायांमुळे युरोपकडे जाणारी तेलवाहतूक धोक्यात आली असून ऊर्जा पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. परिणामी, तेल कंपन्यांचा खर्च वाढला आहे. याशिवाय रियाधला अपेक्षा होती की अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांसारखे मित्रदेश त्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने मदतीला येतील. परंतु प्रत्यक्षात या पाश्चात्य देशांनी मर्यादित आणि अत्यंत सावध भूमिका घेतली. या सामरिक एकाकीपणाच्या भावनेमुळे सौदी अरेबियाला चीनकडे मदतीसाठी वळावे लागले. मात्र चीन मदत करू शकला नाही.

पाकिस्तानवर गंभीर आघात

या जागतिक संकटाचा सर्वाधिक फटका बसलेला देश म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तान आपल्या बहुतांश ऊर्जा गरजा आयातीत तेल आणि नैसर्गिक वायूद्वारे पूर्ण करतो. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल दरवाढ होताच त्याचा त्वरित विपरीत परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होतो; तेथील इंधन दर वाढतात, वीज निर्मितीचा खर्च वाढतो आणि आधीच रिकाम्या असलेल्या सरकारी तिजोरीवर अतिरिक्त ताण पडतो. त्यातच पाकिस्तानकडे पुरेशा प्रमाणात धोरणात्मक (स्ट्रटेजिक) तेलसाठय़ांचा अभाव आहे. पाकिस्तान सध्या प्रचंड महागाई, परकीय चलनाची तीव्र टंचाई, आयएमएफच्या (IMF) कडक अटी आणि अत्यंत मंदावलेला आर्थिक विकास दर यांसारख्या समस्यांनी ग्रासला आहे. अशा वेळी तेलाच्या किमतीत होणारी प्रत्येक वाढ तेथील अन्नधान्य महाग करीत आहे. वाहतूक खर्च आणि उद्योगांचा उत्पादन खर्च वाढवून सामान्य जनतेवरील आर्थिक भार असह्य करीत आहे.

पाकिस्तानने सप्टेंबर 2025 मध्ये सौदी अरेबियाबरोबर परस्पर संरक्षण करार केला होता. या करारानुसार सौदी अरेबियावर झालेला हल्ला हा पाकिस्तानवरील हल्ला मानला जाईल, असे म्हटले गेले. मात्र इराणसमर्थित हुती हल्ल्यांच्या सौदीवरील पार्श्वभूमीवर पाकिस्तानने  लष्करी हस्तक्षेप टाळला. यामुळे पाकिस्तानच्या सामरिक विश्वासार्हतेबाबत आणि मक्का संरक्षण व्यवस्थेच्या प्रत्यक्ष उपयुक्ततेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर शंका उपस्थित झाल्या आहेत.

जागतिक परिणाम

बाब-अल-मंदेब ही सामुद्रधुनी लाल समुद्र, अदनचे आखात, अरबी समुद्र आणि सुएझ कालव्याला जोडणारा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. हुती हल्ल्यांनंतर अनेक आंतरराष्ट्रीय जहाज कंपन्यांनी रेड सीमार्गे होणारी वाहतूक थांबवली आहे. आता जहाजांना केप ऑफ गुड होप मार्गाने संपूर्ण आफ्रिका खंडाला प्रदक्षिणा घालून प्रवास करावा लागत आहे.

मार्ग बदलल्यामुळे जहाजांचा प्रवासाचा कालावधी प्रचंड वाढला आहे, इंधन खर्च वाढला आहे आणि सागरी विम्याचा प्रीमियम कित्येक पटीने महाग झाला आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊन कच्चा माल, औद्योगिक उत्पादने, ऊर्जा आणि ग्राहक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, ज्यामुळे जगभरात महागाई वाढली आहे.

विशेषतः युरोपची आशियाशी असलेली व्यापार साखळी सुएझ कालव्यावर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून असल्याने युरोपीय देशांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. युरोपात उत्पादन खर्च वाढला असून त्यांच्या आर्थिक वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

जागतिक समुदाय या संकटाला कसा सामोरे जात आहे?

हुती संकटाचा सामना करण्यासाठी जागतिक पातळीवर विविध पावले उचलली जात आहेत. अनेक प्रमुख देशांनी रेड सी आणि आसपासच्या भागात आपल्या युद्धनौका तैनात केल्या असून व्यापारी जहाजांना लष्करी संरक्षण पुरवणे आणि हवाई व समुद्री पाळत वाढवणे सुरू केले आहे.

हुती बंडखोरांकडे इराणची ‘प्रतिनिधी शक्ती’ (Proxy Force) म्हणून पाहिले जाते. या संघर्षाच्या माध्यमातून इराणला सौदी अरेबियावर दबावाचे राजकारण करता येत आहे, पश्चिमी राष्ट्रांना थेट आव्हान देता येत आहे आणि रेड सी परिसरात आपला लष्करी व राजनैतिक प्रभाव वाढवता येत आहे.

भारताला काय संधी?

हुती हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने अरबी समुद्र, अदनचे आखात आणि पश्चिम हिंदी महासागरात आपली गस्त लक्षणीयरीत्या वाढवली आहे. भारतीय व्यापारी जहाजांचे संरक्षण करणे, ही नौदलाची मुख्य उद्दिष्टे आहेत. या संकटातून भारताला काही महत्त्वपूर्ण सामरिक संधीही उपलब्ध झाल्या आहेत. हिंदी महासागर क्षेत्रात एक विश्वासू ‘प्रादेशिक सुरक्षा पुरवठादार’ (Regional Security Provider) म्हणून उदयास येण्याची संधी भारताला मिळाली आहे. तसेच आखाती देशांशी सुरक्षा आणि राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याची व आपल्या ‘ब्लू वॉटर नेव्ही’ क्षमतेचा विस्तार जगासमोर सिद्ध करण्याची संधी भारताला प्राप्त झाली आहे.

एपंदरीत चित्र असे दिसत आहे की, हुतींचे अधूनमधून हल्ले सुरूच राहतील, तेलाचे भाव उच्च पातळीवर राहतील आणि सागरी व्यापारातील अडथळे कायम राहतील. सौदी अरेबिया आणि हुती यांच्यात पुन्हा तीव्र युद्ध सुरू होऊ शकते. त्यात इराणचा थेट सहभाग वाढू शकतो आणि जागतिक तेल बाजाराला मोठा धक्का बसू शकतो. यामुळे तेलाचे भाव झपाटय़ाने वाढून जागतिक महागाई भडकेल आणि पाकिस्तानसारख्या कमकुवत अर्थव्यवस्थांवर अत्यंत गंभीर परिणाम होतील.