
जंतर मंतरवरील ज्ञानेश कुमारविरोधी आंदोलन पोलिसांच्या मदतीने दडपणाऱया मोदी सरकारवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज जोरदार हल्ला चढवला. ‘लाठय़ाकाठय़ांचा धाक दाखवून गर्दी पांगवली जाऊ शकते, पण प्रश्न थांबणार नाहीत. ज्ञानेश कुमारांना तर जावे लागेलच, पण त्यांना बसवणाऱ्या सिस्टमलाही जावे लागेल,’ असा इशारा राहुल यांनी दिला.
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून हजारो तरुण आज जंतर मंतरवर आंदोलनासाठी उतरले. ‘देशातील निवडणूक घोटाळय़ाचे कथित सूत्रधार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवा’ अशी त्यांची मागणी होती. पोलिसांनी हजारो आंदोलकांना ताब्यात घेऊन हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. अनेक आंदोलकांना फरफटत नेऊन गाडीत कोंबले. राहुल गांधी यांनी ‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून यावर संताप व्यक्त केला.
‘बापूंनी शिकवलं होतं की, खरं बोला आणि शांततेच्या मार्गानं लढा. विद्यार्थी हेच करतायत. सरकारला नेमकी याच गोष्टीची भीती वाटतेय.’
‘एक्स’ पोस्टमध्ये काय?
‘आज गांधी जयंती आहे. याच दिवशी हजारो तरुण मतचोरीच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. कुठलाही हिंसाचार न करता शांततेत आपल्या घटनात्मक अधिकाराचा वापर करत आहेत. ‘ज्ञानेश कुमारांना हटवा, लोकशाही वाचवा’ अशी त्यांची मागणी आहे. मोदी-शहा सरकारने त्यांना कसा प्रतिसाद दिला, तर तरुण-तरुणींना फरफटत नेऊन ताब्यात घेतले गेले. मतचोरीच्या मुद्दय़ावर प्रश्न विचारला एवढाच त्याचा दोष आहे,’ असे राहुल गांधी म्हणाले.




























































