प्रदीप पुर्णेकर हत्याकांड, अलिबागच्या डेअरीमध्ये लपलेल्या दोन फरार मारेकऱ्यांना अटक; 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे मानपाडा येथील विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी फरार असलेल्या चार आरोपींपैकी दोघांना शुक्रवारी पहाटे अटक केली. निखिल यादव आणि नितेश पवार अशी या मारेकऱ्यांची नावे आहेत. हे दोघेही अलिबागजवळील एका डेअरीमध्ये लपून बसले होते. त्यांना शुक्रवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. अन्य दोन फरार आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

पुर्णेकर यांच्या हत्याकांडाच्या तपासासाठी ठाणे पोलीस आयुक्तांनी 23 अधिकारी, कर्मचाऱ्यांची एसआयटी स्थापन केली आहे. त्यानंतर या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. पुर्णेकर यांची हत्या झाली त्या रात्रीच पप्या शिंदे या आरोपीला अटक करण्यात आली होती. या हत्याकांडात एपूण पाच मारेकरी असल्याचे समोर आले. त्यातील निखिल यादव, नितेश पवार, संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि आणखी एक अज्ञात आरोपी असे चौघे फरार झाले होते.

निखिलने गोळीबार केला; नितेशने कोयत्याने वार केले

पोलिसांच्या तपासानुसार निखिल यादव याने प्रदीप पुर्णेकर यांच्यावर गोळीबार केला तर नितेश पवार याने त्यांच्यावर कोयत्याचे वार केल्याची माहिती समोर आली आहे. तो नेहमी नशेत असायचा. निखिल यादव हा पुर्णेकर यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या वडापावच्या गाडीवर काम करत होता तर नितेश पवार हा पोलिसांच्या नोंदीनुसार सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. तो एका बडय़ा राजकीय व्यक्तीच्या सतत संपका&त होता, अशी माहिती समोर आली आहे.

निखिल यादव याला आठवडाभर फायरिंगचे ट्रेनिंग

प्रदीप पुर्णेकर यांची हत्या करण्याचे प्लॅनिंग एक महिन्यापूर्वीच करण्यात आले होते, अशीही माहिती समोर आली आहे. या हत्येच्या घटनेत पप्या शिंदे याचा रोल महत्त्वाचा होता. निखिल यादव याने गोळय़ा झाडल्या. त्यासाठी त्याला एक आठवडा फायरिंगचे ट्रेनिंग देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुन्हे शाखा या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.