
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमदार-खासदार खरेदी करण्याचा इतकाच शौक असेल तर त्यांनी आयपीएलसाठी जसा लिलाव होतो, तसा आमदार-खासदारांचा लिलाव ठेवावा आणि बोली लावावी,’ अशी बोचरी टीका सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मोदी-शहांवर केली. ‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लुटल्याचा आरोपही त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे जेन झी आंदोलकांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी दीपके यांनी देशातील आमदार-खासदारांच्या फोडाफोडीवर तीव्र संताप व्यक्त केला. ‘सर्वसामान्य नागरिकांच्या मताला भाजप किंमत देत नाही. आमदार-खासदार थेट विकत घेतले जातात. विकल्या जाणाऱया आमदार-खासदारांनाही शरम नाही. बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असल्यासारखे ते भाजपसोबत निघून जातात,’ असा टोला दीपकेंनी हाणला.
ज्ञानेश कुमार यांना नेमके कशासाठी आणले, 2019 पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये घोटाळे कसे झाले हेही दीपके यांनी सांगितले. ‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सरळसरळ लुटल्याचा आरोप त्यांनी केला. ‘40 लाख मते अचानक वाढली. ज्ञानेश कुमारांनी ही मते आणली. अरविंद केजरीवाल, एम. के. स्टॅलिन, ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघात मते कापली गेली. जिथे-जिथे मते कापली गेली, तिथे विरोधकांचे नेते हरले. भाजपचा एकही मुख्यमंत्री कसा हरत नाही, असा सवाल दीपके यांनी केला.
मोदींची ती योग्यता नाही!
‘नरेंद्र मोदी हे स्वतःची तुलना गांधी, नेहरूंशी करू पाहतात. पण मोदींची ती योग्यता नाही. महात्मा गांधी हे देशाचा आत्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा कणा आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाची बुद्धी होते. निवडणुका जिंकून त्यांच्यापेक्षा मोठे होऊ असे मोदींना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे,’ असे दीपकेंनी सुनावले.
मुंबई पोलिसांचे मानले आभार
शिवाजी पार्क येथील आंदोलन सुरळीत होऊ दिल्याबद्दल अभिजीत दीपके यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले. ‘मुंबई पोलिसांनाही आम्हाला उचलण्याची ऑर्डर वरून आली होती. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्यांनी चहा पाजला आणि आम्हाला जाण्याची विनंती केली. आम्ही जे करत आहोत ते चांगले काम आहे, असेही पोलीस म्हणाले. मी त्यांना सॅल्यूट करतो, असे दीपके म्हणाले. जंतर मंतरील आजच्या आंदोलनादरम्यान तेथील आंदोलकांवर कारवाई करणारे दिल्ली पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांच्यावर दीपके यांनी सडकून टीका केली. ‘शर्मा हा पोलीस अधिकारी नसून अमित शाह यांचा जनरल डायर आहे, असा हल्ला दीपके यांनी चढवला. बॅरिकेड लावून आम्हाला रोखता काय? थोडे दिवस थांबा. इतके लोक दिल्लीत येतील की तुमचे बॅरिकेड्स कमी पडतील, असा इशारा दीपके यांनी दिला.
मॅच फिक्स्ड असली की सगळे बॉल ‘नो’ टाकायचे नसतात!
केरळसारख्या राज्याचा दाखला देऊन सत्ताधारी भाजप मतचोरीचा आरोप फेटाळून लावत आहे. भाजपच्या या तर्कावर दीपके यांनी प्रहार केला. ते म्हणाले, ‘मॅच फिक्स असली की सगळे बॉल ‘नो’ टाकले जात नाहीत. मॅच फिक्स्ड असली की सगळेच कॅच सोडले जात नाहीत. काही बॉल चांगले टाकावे लागतात. काही कॅच पकडावे लागतात. भाजपही तेच करत आहे. कमी खासदार संख्या असलेली राज्ये विरोधकांकडे जाऊ देतात. जेणेकरून आरोपांना उत्तर देता येईल. तुमची सेटिंग चांगली समजते. आम्हाला वेडे समजता का, असा सवाल दीपके यांनी भाजपला केला.



























































