
आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने इतिहास रचत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तब्बल 44 वर्षांनंतर हिंदुस्थानने महिला हॉकीचे सुवर्णपदक आपल्या नावावर केले आहे. अंतिम सामन्यात हिंदुस्थानने बलाढय़ चीनचा 1-0 असा पराभव करत हा ऐतिहासिक विजय साकारला. या सुवर्ण विजयासोबतच महिला हॉकी संघाने 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे.
लालरेम्सियामीचा निर्णायक गोल
हिंदुस्थानच्या विजयाची शिल्पकार लालरेम्सियामी हमारजोटे ठरली. सामन्याच्या पहिल्याच क्वार्टरमध्ये दहाव्या मिनिटाला तिने निर्णायक गोल डागला. 2017 मध्ये पदार्पण करणाऱया लालरेम्सियामीचा हा 200 वा आंतरराष्ट्रीय सामना होता आणि तिने या सामन्याचे सोने केले. दुसऱया बाजूला सामन्याच्या 23 व्या मिनिटाला चीनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला होता. पण हिंदुस्थानची गोलकिपर सविता पुनियाने अप्रतिम बचाव करत चीनचा हा प्रयत्न हाणून पाडला.
चीनने गोलकिपरलाही हटवले
गोल बरोबरीत आणण्यासाठी चीनने सर्व ताकद पणाला लावली. सामन्याच्या शेवटच्या चार मिनिटांत चीनने आपल्या गोलकिपरलाही मैदानाबाहेर बोलावून त्या जागी अतिरिक्त स्ट्रायकर मैदानात उतरवला. चीनचे सर्वच्या सर्व 11 खेळाडू आक्रमणासाठी सरसावले होते, मात्र तरीही हिंदुस्थानने गोल करण्याची संधी दिली नाही. सामन्यात चीनला पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु एकाचेही ते गोलमध्ये रूपांतर करू शकले नाहीत, तर हिंदुस्थानला केवळ एक पेनल्टी कॉर्नर मिळाला.
मलेशियाला चिरडण्यासाठी हिंदुस्थानी हॉकी सज्ज
पाकिस्तानला 4-3 असा धक्का देत अंतिम फेरीत धडक मारणारा हिंदुस्थानी हॉकी संघ आता इतिहासाच्या उंबरठय़ावर उभा आहे. शनिवारी मलेशियाविरुद्ध होणारी अंतिम लढत म्हणजे फक्त आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाची लढाई नाही तर एका विजयासोबत हिंदुस्थानला सलग दुसरे आशियाई सुवर्ण आणि लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचे थेट तिकीट मिळणार आहे.
हिंदुस्थानने 2023 मध्ये सुवर्ण जिंकले होते. मात्र पुरुष हॉकीत सलग दोन आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम अद्याप हिंदुस्थानच्या नावावर नाही. त्यामुळे हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघासमोर शनिवारी इतिहास बदलण्याची संधी आहे. विशेष म्हणजे मलेशियाही या स्पर्धेत अपराजित आहे.
आता मात्र त्या सामन्यातील बचावातील चुका परवडणार नाहीत. हिंदुस्थानच्या आक्रमणाची धुरा पुन्हा कर्णधार हरमनप्रीत सिंग, अभिषेक आणि दिलप्रीत सिंग यांच्या खांद्यावर असेल. हरमनप्रीतने या स्पर्धेत पेनल्टी कॉर्नरवरून 10 गोल केले आहेत, तर अभिषेक आणि दिलप्रीतच्या खात्यात प्रत्येकी नऊ गोल आहेत. मलेशियाकडे फैझल सारी आणि अबू कमाल अझराय हे प्रत्येकी नऊ गोलांसह सज्ज आहेत.


























































