
शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येशी आमचा काही संबंध नाही, असा दावा करताय ना.. मग कर नाही त्याला डर कशाला.. थेट चौकशीला सामोरे जा, असे आव्हान आज शिवसेनेच्या महिला आघाडीने शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना दिले. या प्रकरणात शिवसेनेच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण याद राखा, रस्त्यावर उतरून तुमचा बुरखा फाडू, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांचे नाव एफआयआरला जोडलेल्या पुरवणी जबाबात आले. त्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थयथयाट केला. उडवाउडवीची उत्तरे दिली. महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर आणि माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांनी त्यांचा जोरदार समाचार घेतला.
आगरी, कोळ्यांची पोलीस ठाण्यावर धडक
खोपकर आणि तरे यांनी मीनाक्षी शिंदे यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, शिवसेना नेत्यांविषयी खालच्या थरावर जाऊन आरोप केले तर ते मुळीच सहन करणार नाही. रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही महिला आघाडीने दिला. 4 ऑक्टोबर रोजी ठाण्यातील आगरी व कोळी समाज या हत्येविरोधात एकत्र येऊन पोलिसांना निवेदन देणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
संसदरत्न खासदार, उपमुख्यमंत्री कुठे आहेत?
इतकी भयंकर हत्या झाली असताना स्वतŠला संसदरत्न म्हणवणारे खासदार तसेच उपमुख्यमंत्री गेले पुठे, ते गप्प का? असा सवाल रेखा खोपकर आणि महेश्वरी तरे यांनी केला. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी नगरसेवक संजय तरे, प्रमिला भांगे, अनिता हिलाल, ज्योती कदम, अनिता प्रभू, संगीता साळवी, नंदा कडकोळ, संगीता जाधव, जयश्री धामसे, मंगला कोलेकर आदी उपस्थित होते.
मीनाक्षी शिंदे खोटं बोलताहेत
पत्रकार परिषदेत विषय भरकटवून हात झटकण्याचा मीनाक्षी शिंदे यांचा प्रयत्न सुरू आहे. आपल्यावरील आरोपाचा पह्कस दुसरीकडे फिरवून या प्रकरणात आपला हात नाही, असे दाखवण्याचा त्या प्रयत्न करत आहेत, असा आरोप एकता गाव बचाव समितीने केला आहे. पोलीस तपासात सत्य समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तीन दिवसांनी पूर्णेकरांचे कार्यालय उघडले, एसआयटीकडून पुराव्यांचा शोध
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर तीन दिवसांपासून बंद असलेले त्यांचे कार्यालय आज एसआयटी पथकाच्या उपस्थितीत उघडण्यात आले. गुरुवारी एसआयटी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली होती. त्यानंतर आज पुन्हा पथकाने कार्यालयाची तपासणी करून घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे गोळा केले. कार्यालयात रक्ताचे डाग तसेच अन्य खुणा आढळल्या. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करताना गोळीबारात वापरण्यात आलेल्या काडतुसांच्या पुंगळ्या आणि इतर महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.





























































