
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरकारभाराविरोधात ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांनी पुण्यात एस.एम. जोशी पुलाजवळ गुरुवारपासून आंदोलन सुरू केले आहे. आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी आज आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर काही मागण्यांवर शासनाकडून निर्णय झाले तरी अध्यक्षांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम आहेत.
‘एमपीएससी’च्या औषध निरीक्षक पदाच्या भरतीचा पेपर फुटल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱया विद्यार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या परीक्षेप्रमाणे इतर परीक्षांचेही पेपर फुटले आहेत का, अशी शंका विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात असून याची चौकशी व्हावी. आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या कार्यकाळात ही पेपरफुटी झाली आहे. त्यामुळे पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
शरद पवार, राहुल गांधी आंदोलकांना भेटणार
एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा कॅबिनेटमध्ये असा प्रस्ताव आणून तो राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे राजीनाम्याचे प्रकरण पाठवून द्यावे, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली. शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तर सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतील, अशी माहितीही रोहित पवार यांनी दिली.
अहिल्या लायब्ररी येथेही विद्यार्थ्यांचे आंदोलन
लालबहाद्दूर शास्त्र्ााr रोडवरील अहिल्या लायब्ररी येथेही अचानकपणे गुरुवारी रात्री उशिरापासून विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू आहे. राज्यसेवेची परीक्षा ‘ऑब्जेक्टिव्ह’ पद्धतीने झाली पाहिजे, माजी अध्यक्षांच्या काळातील परीक्षांची चौकशी करण्यात यावी, अशा मुख्य मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. दरम्यान, अहिल्या लायब्ररी येथील आंदोलनामागे सरकार असल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये रंगली होती.
मोठय़ा बंदोबस्तामागे अदृश्य शक्तीचा हात – सुप्रिया सुळे
अध्यक्ष भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी पह्नवरून संवाद साधत पाठपुरावा करणार आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पहलगाम येथे बॉम्बस्पह्ट झाला तेव्हा एकही पोलीस तिथे नव्हता. येथे मुले आंदोलनाला बसली आहेत, तर दोन सर्व्हेलन्स व्हॅन ठेवण्यात आल्या आहेत. यात पोलिसांची चूक नाही. मी कधीच पोलिसांना नावे ठेवत नाही. यामागील अदृश्य शक्ती हा प्रश्न आहे. मात्र आम्ही ताकदीने विद्यार्थ्यांसोबत आहोत, असे त्या म्हणाल्या.




























































