वायू प्रदूषणाच्या ‘हॉटस्पॉट’वर लक्ष , बांधकाम स्थळे, रस्त्यावरील धूळ, राडारोडा, कचरा जाळण्याच्या ठिकाणांवर देखरेख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेने ‘वायू प्रदूषण नियंत्रण व अंमलबजावणी पृती आराखडा-2026’ तयार केला आहे. या पृती आराखडय़ानुसार प्रत्येक प्रशासकीय विभागात किमान दहा वायू प्रदूषण हॉटस्पॉट निश्चित करून त्यांची अद्ययावत यादी व नकाशा तयार करण्यात येणार आहे. मोठी बांधकामे व पुनर्विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा कामे, खुली कचरा जाळण्याची ठिकाणे, राडारोडा टाकण्याची ठिकाणे तसेच वाहतूक कोंडीच्या जागा यांचा हॉटस्पॉटमध्ये समावेश करण्यात येणार आहे. प्रत्येक हॉटस्पॉटसाठी जबाबदार अधिकारी निश्चित करून नियमित देखरेख करण्यात येणार आहे.

रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी मोहीम

पावसाळय़ानंतर रस्त्यांवर साचलेला गाळ, चिखल आणि धूळ हटविण्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या व दुसऱया आठवडय़ात ‘पोस्ट-मान्सून डीप क्लीनिंग ड्राईव्ह’ राबविण्यात येणार आहे. प्रमुख रस्ते, दुभाजक, चौक व रस्त्यांच्या कडांची विशेष स्वच्छता करण्यात येणार आहे. आवश्यकता असेल तर पुनर्वापराच्या पाण्याने रस्ते धुणे अथवा पाण्याची सूक्ष्म फवारणी केली जाणार आहे. वायू गुणवत्ता निर्देशांक वाढल्यास अतिरिक्त उपाययोजना यावर भर देण्यात येणार आहे.

विकासकावर जबाबदारी

बांधकाम स्थळाच्या आकारानुसार संबंधित विकासक किंवा कंत्राटदाराने लगतचे रस्तेही स्वच्छ ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. 4,000 चौरस मीटरपर्यंतच्या प्रकल्पासाठी 100 मीटर, 4,000 ते 10,000 चौरस मीटर प्रकल्पासाठी 200 मीटर आणि 10,000 चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या प्रकल्पासाठी दोन्ही बाजूंना 500 मीटरपर्यंतचे रस्ते स्वच्छ ठेवावे लागणार आहेत.

बांधकाम स्थळांवर काटेकोर अंमलबजावणी

बांधकाम व पाडकामस्थळांवर सध्याच्या 28 कलमी मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम स्थळांवर कारणे दाखवा नोटीस, कामबंदीची नोटीस तसेच आवश्यकतेनुसार सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक पथकाने दररोज किमान दोन बांधकाम स्थळांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.