
क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये नेहमीच महामुकाबला असलेली हिंदुस्थान–पाकिस्तान यांच्यातील लढत आता आशियाई क्रीडा स्पर्धेतही रंगणार आहे. प्रथमच शनिवारी सकाळी हिंदुस्थान–पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. मात्र यावेळी दावणीला वर्ल्ड कप नाही, तर थेट सुवर्णपदकाची लढाई आहे. दोन्ही संघ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष क्रिकेटमध्ये प्रथमच भिडणार असले तरी गतविजेता हिंदुस्थान ‘गोल्डन’ डरकाळी मारण्यासाठी सज्ज झाला आहे.
हिंदुस्थानने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा 124 धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. ईशान किशनच्या नाबाद 80 धावा आणि त्यानंतर जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, अभिषेक शर्मा यांच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा डाव अवघ्या 45 धावांत संपला. आता समोर पाकिस्तान आहे. बांगलादेशविरुद्ध त्यांचा उपांत्य सामना पावसामुळे 13 षटकांचा झाला. 112 धावांचे लक्ष्य गाठताना पाकिस्तानची 4 बाद 53 अशी अवस्था झाली होती, पण अब्दुल समदच्या नाबाद 30 धावांनी सामना त्यांच्या बाजूने झुकवला.
पाकिस्तानचा कर्णधार साहिबजादा फरहान हा हिंदुस्थानसाठी प्रमुख धोका. त्याचवेळी हिंदुस्थानी ताफ्यात वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, ईशान किशन, तिलक वर्मा, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमरा अशी सुपरस्टार्सची फौज आहे.
टी-20 मध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध नेहमीच वर्चस्व राखले आहे. मात्र अंतिम फेरीत आकडेवारीपेक्षा क्षण महत्त्वाचा असतो. निस्शिनच्या फिरकी आणि उसळी देणाऱया खेळपट्टीवर पहिल्या षटकापासूनच खरी कसोटी असेल. शनिवारची लढत केवळ हिंदुस्थान–पाकिस्तान सामना नाही तर नागोयाच्या आकाशात तिरंगा उंचावण्यासाठीचा ‘गोल्डन मुकाबला’ आहे.

























































