
मध्य प्रदेशमधील मोरेना (Morena) शहरात हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. आठ वर्षांचा चिमुरडा आपल्या दोन वर्षांच्या भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन रस्त्यावर बसला होता. दुसरीकडे त्याच्या वडिलांची रुग्णवाहिकेसाठी धावाधाव सुरू होती. सुमारे दोन तास हा प्रकार सुरु होता. यावेळी बघ्यांची मोठी गर्दीही जमा झाली होती. परंतु एकानेही मदतीचा हात पुढे केला नाही. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
मोरेना जिल्ह्यातील अंबाहमधल्या बडफरा गावातील पूजाराम जाटव यांच्या दोन वर्षाच्या राजा या मुलाची तब्येत अचानक बिघडली होती. सुरुवातीला पूजाराम यांनी घरीच मुलावर उपचार सुरू केले. परंतु तब्येत जास्तच खालावल्याने त्याला मोरेना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांचा आठ वर्षाचा मुलगा गुलशनही त्यांच्यासोबत होता.
जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान राजाचा मृत्यू झाला. पूजाराम यांनी रुग्णालय प्रशासनाला मुलाचा मृतदेह गावी नेण्यासाठी रुग्णावहिकेची व्यवस्था करण्याची विनंती केली. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना दाद दिली नाही. तसेच रुग्णवाहिका देण्यासही नकार दिला. त्यानंतर पूजाराम मुलाचा मृतदेह घेऊन रुग्णालयाबाहेर आले आणि रस्त्यावर बसले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खासगी रुग्णवाहिका करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते.
दीड हजारांसाठी धावाधाव
मुलाचा मृतदेह गावी नेण्यासाठी पूजाराम यांना दीड हजारांची गरज होती. पैसे नसल्याने त्यांनी सरकारी रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न केले, परंतु त्यांना दाद मिळाली नाही. अखेर कमी पैशांमध्ये रुग्णवाहिका मिळावी म्हणून त्यांना धावाधाव करावी लागली. तोपर्यंत त्यांचा मोठा मुलगा आपल्या लहान भावाचा मृतदेह घेऊन रस्त्याच्या कडेला बसला होता. याची माहिती प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सरकारी रुग्णवाहिका करून मृतदेह गावी पाठवण्याची व्यवस्था करून दिली.
काँग्रेसचा निशाणा
दरम्यान, काँग्रेसने संधी साधत मध्य प्रदेशमधील आणि केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. हे वेदनादायक चित्र भावूक करत असून मध्य प्रदेशमधील आरोग्य व्यवस्थेचा रागही येतोय. मध्य प्रदेशमध्ये आठ वर्षांचा मुलगा आपल्या धाकट्या भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन बसला असून त्यांचे वडील रुग्णवाहिका शोधताहेत. हेच पंतप्रधान मोदींच्या व्यवस्थेचे सत्य आहे, असे ट्विट काँग्रेसने केले आहे.
ये दर्दनाक तस्वीर भावुक भी कर रही है और मध्यप्रदेश में स्वास्थ्य व्यवस्थाओं पर गुस्सा भी दिला रही है।
मध्यप्रदेश में एक आठ साल के बच्चे की गोद में अपने छोटे भाई का शव है और पिता एम्बुलेंस खोजने निकले हैं।
यही है पीएम मोदी की व्यवस्थाओं का सच! pic.twitter.com/Dt708Xy5JH
— Congress (@INCIndia) July 10, 2022


























































