शेकडो स्फोटके शोधून हजारोंचे प्राण वाचवले, उंदीरमामांचा शौर्यपदकाने गौरव

पराक्रम गाजवणारी माणसे आणि श्वानांना शौर्य पुरस्कार दिल्याचे सर्वांना माहीत असेल. पण ब्रिटनमध्ये चक्क एका उंदराचा त्याच्या शौर्याबद्दल सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात आला. ‘मागावा’ असे त्याचे नाव आहे. मागावा हा काही साधासुधा उंदीर नव्हे. 28 जिवंत स्फोटकांचा शोध लावून त्याने हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत. याशिवाय 39 भूसुरूंग यशस्वीरीत्या शोधून काढले.

ब्रिटनमधील ‘पीडीएसए’ या संस्थेने मागावाला सुवर्णपदक प्रदान केले. आफ्रिकन जातीचा मागावा हा उंदीर सात वर्षांचा आहे. त्याचे वजन आहे 1 किलो 20 ग्रॅम. तो भूसुरुंगावरून चालत गेला तरी त्याच्या वजनामुळे स्फोट होत नाही. हीच गोष्ट हेरून बेल्जियमच्या ‘एपीओपीओ’ या संस्थेने त्याला प्रशिक्षित केले.

बॉम्ब डिटेक्टरच्या मदतीने पोलिसांना बॉम्ब शोधायला वेळ लागतो आणि प्रसंगी स्फोट होण्याचाही धोका असतो. त्यापेक्षाही कमी वेळात मागावा हा उंदीर केवळ वास घेऊन स्फोटके शोधून काढतो. टेनिसच्या मैदानाइतक्या परिसरातून स्फोटके शोधण्यास त्याला फक्त अर्धा तास लागतो. स्फोट होण्याची शक्यता अगदीच अत्यल्प.

मागावाने कंबोडियात फुटबॉलच्या 20 मैदानांइतक्या आकाराच्या परिसरातून भूसुरूंग आणि स्फोटके शोधून काढली होती. ‘एपीओपीओ’ ही संस्था 1990 पासून आफ्रिकेच्या टांझानियामध्ये उंदरांना प्रशिक्षण देत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या