महाबळेश्वर तहसीलमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू, तहसीलदार सुषमा चौधरी यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर येणारी आपत्ती लक्षात घेता ग्रामीण भागात तातडीने मदत पोहोचविण्यासाठी महाबळेश्वर तहसील कार्यालयात तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी दिली.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पश्चिम भागात महापूर व भूस्खलन होऊन हाहाकार माजला होता. तालुक्यातील 85 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. अनेक ठिकाणी रस्ते, पूल, शेती, घरे वाहून गेली होती. पिण्याच्या पाण्याच्या योजना वाहून गेल्या. अनेक विहिरी गाळाने भरल्या, तर जागोजागी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. यंदाही अशाच प्रकारे अतिवृष्टीमुळे आपत्ती ओढविण्याचा संभव लक्षात घेऊन आपत्तीग्रस्त लोकांपर्यंत तातडीने मदत पोहोचविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालयात आपत्तीकक्ष स्थापन करण्यात आला आहे. आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व महसूल कर्मचाऱयांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी दिली.

ज्या गावांना गेल्या वर्षी आपत्तीचा फटका बसला, अशा गावातील लोकांनी अधिक सतर्क राहावे, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, जी गावे नदीकाठी व डोंगर उतारावर आहेत, अशा गावांतील लोकांनी स्थलांतर करून सुरक्षित ठिकाणी जावे, पाण्यालगत पाच मीटर परिसरातील घरात राहू नये, असे आवाहन तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी केले आहे. येरणे खुर्द, येरणे बुद्रूक, दरे, दुधोशी व घावरी या गावांनी अधिक सतर्क राहावे तसेच कठीण प्रसंग आल्यास आपत्तीकक्ष दूरध्वनी क्रमांकावर 260229 संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

सांगलीत मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष सुरू

सांगली पाटबंधारे विभागात येथे बुधवारपासून (दि. 1 जून) मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष स्थापन झाला आहे.

या नियंत्रण कक्षाअंतर्गत कृष्णा उपखोऱयातील माहिती एकत्रित करून प्रशासन, प्रसारमाध्यमे यांना संबंधित यंत्रणामार्फत उपलब्ध करून दिली जाते. पूर नियंत्रण कक्ष अधिकारी म्हणून सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. हा कक्ष 1 जून ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत 24 तास कार्यरत ठेवण्यात येणार आहे.

पूर नियंत्रण कक्षाचे उद्घाटन कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपकार्यकारी अभियंता ता. रा. काळे, मो. रा. गळंगे, वि. वि. मुंजाप्पा, समन्वय अधिकारी श्वेता दबडे उपस्थित होत्या. 0233-2301820/2302925, मोबाईल 9307862396 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.