महाभारतातील ‘श्रीकृष्ण’ अडकला कौटुंबिक कलहात, पूर्वाश्रमीच्या पत्नीविरोधात केली पोलिसात तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोट्या पडद्यावरील ‘महाभारत’ मालिकेमध्ये श्रीकृष्णाची अजरामर भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी पूर्वाश्रमीची पत्नी आयएएस स्मिता भारद्वाज हिच्याविरोधात पोलीस स्थानकामध्ये धाव घेतली आहे. स्मिता आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप नितीश भारद्वाज यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीश भारद्वाज यांनी भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्र यांना तक्रारीचा मेल केला आहे. नितीश भारद्वाज यांची पूर्वाश्रमीची पत्नी स्मिता भारद्वाज ही मध्य प्रदेश कॅडरची आयएसएस आहे. तिच्याविरोधात नितीश भारद्वाज यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

स्मिता आपल्याला मानसिक त्रास देत असून जुळ्या मुलींना भेटू देत नसल्याचा आरोप नितीश भारद्वाज यांनी केला आहे. या तक्रारीनंतर भोपाळच्या पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले असून तपासाची जबाबदारी पोलीस उपायुक्त शालिनी दीक्षित यांच्याकडे सोपवली आहे.

दरम्यान, भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्र यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आम्हाला नितीश भारद्वाज यांची तक्रार मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलीस सर्व बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.

नितीश भारद्वाज यांनी महाभारत या गाजलेल्या मालिकेमध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. यामुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. पुढे त्यांनी मध्य प्रदेश कॅडरची आयएएस अधिकारी स्मिता यांच्याची 14 मार्च 2009 रोजी दुसरे लग्न केले. या लग्नाआधी दोघांचेही पहिले लग्न आणि घटस्फोट झालेला होता. दोघांना जुळ्या मुली असून त्या 11 वर्षांच्या आहेत. मात्र लग्नाच्या 12 वर्षानंतर 2022मध्ये दोघेही वेगळे झाले. सध्या स्मिता या मुलींसोबत इंदूर येथे राहतात.

एका मुलाखतीमध्ये बोलताना नितीश भारद्वाज यांनी सप्टेंबर 2019मध्ये आपण कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे म्हटले. यामागील कारणांची मिमांसा मी करणार नाही, पण घटस्फोट मृत्युपेक्षाही वेदनादायक असतो, असेही ते म्हणाले होते.