2 हजार कोटींचा घोटाळा, महादेव अॅपचा संचालक मृगांक मिश्राला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या महादेव अॅपचा संचालक मृगांक मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या प्रतापगढ पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. तो दुबईत राहून हिंदुस्थानात सट्टेबाजी करत होता आणि त्याने आतापर्यंत सट्टेबाजीतून कोट्यवधी रुपये कमवले आहेत.

मृगांकविरोधात पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली होती. तो जसा दुबईहून मुंबई विमानतळावर पोहोचला, पोलिसांनी त्याला अटक केली. तो मूळचा रतलाम जिल्ह्याचा रहिवासी आहे. महादेव अॅपवरून होणाऱ्या सट्टेबाजीचा खुलासा होताच मिश्रा याचा शोध घेण्यात येत होता. काही दिवसांपूर्वीच या अॅपशी संबंधित अनेक सेलिब्रिटींची नावं चर्चेत आली होती. त्यात काही चित्रपट कलाकारांचाही समावेश आहे.

मृगांक याने सट्टेबाजीची रक्कम उडवण्यासाठी एक क्लृप्ती केली होती. त्याने प्रतापगढ येथे सरकारी योजनांमध्ये पैसे कमवण्याची लालूच दाखवून अनेक नागरिकांकडून बँकांमध्ये खाती उघडली. मग सट्टेबाजीची रक्कम या खात्यांमध्ये टाकायला लावली. हा आकडा सुमारे 2 हजार कोटी इतका आहे.

बँकेने या खात्यांवर आक्षेप घेतल्यानंतर सायबर गुन्हे शाखेने त्यांची पडताळणी सुरू केली. त्यानंतर आर्थिकरित्या निर्धन असलेल्या 90 लोकांकडे सुमारे 2 हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्यानंतर या प्रकाराचा खुलासा झाला.