
दुधाचा खरेदी दर वाढल्याने वर्षभरापासून आर्थिक अडचणींचा सामना करणाऱया महानंद डेअरीला आता दूध पावडरीची ताकद मिळाली आहे. दुधाचे दर वाढल्याने महानंद डेअरीला पुरेसे दूध उपलब्ध होत नसल्याने सात-आठ महिन्यांपासून पुणे येथील दूध पावडर प्रकल्प बंद आहे. मात्र आता येथे नॅचरल डेअरीच्या तब्बल तीन लाख लिटर दुधाची पावडर तयार केली जात आहे. त्यामुळे प्रतिकिलो पावडरीला 21 रुपयांप्रमाणे दिवसाला सुमारे सहा लाख रुपयांचा व्यवसाय मिळाला आहे. त्यामुळे आर्थिक चणचणीचा सामना करणाऱया महानंदला काहीसा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील दूध संघांची शिखर संस्था असलेली महानंद डेअरी दुधाचा वाढलेला खरेदी दर आणि घटलेल्या विक्रीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. डेअरीला सध्या प्रतिलिटर दुधाच्या विक्रीतून नफा मिळण्याऐवजी तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे महानंदने वरवंड येथील दूध पावडर प्रकल्प बंद ठेवला होता. हा प्रकल्प बंद असला तरी महिन्याला कर्मचाऱयांचे पगार आणि अन्य घटकांवर सुमारे तीस लाख रुपये खर्च होतात. डेअरीवर पडणारा हा आर्थिक भार कमी करण्यासाठी नॅचरल या खासगी डेअरीला त्यांच्या दुधापासून पावडर निर्मिती करून दिली जात असल्याचे महानंदचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजी पहिनकर यांनी सांगितले. सुमारे दहा-अकरा लिटर दुधापासून एक किलो पावडर तयार होते. त्यासाठी डेअरीला 21 रुपये मिळत आहेत. त्यामुळे सर्व खर्च भागून वर्षभरात सुमारे सहा-सात कोटी रुपये डेअरीला मिळतील असे त्यांनी सांगितले.


























































