
सामना ऑनलाईन । लखनौ
अयोध्येतील राममंदिरासाठी संतमहंत आक्रमक झाले असून 5 डिसेंबरपर्यंत राममंदिराच्या उभारणीची घोषणा न झाल्यास आपण 6 डिसेंबरला आत्मदहन करू, असा इशारा अयोध्येचे महंत परमहंस महाराज दास यांनी दिला आहे. ते भदोही जिल्हय़ातील सीतामढी येथे बोलत होते. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे राममंदिराची उभारणी रेंगाळल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.
सरकारने 5 डिसेंबरपर्यंत राममंदिराच्या उभारणीची घोषणा करावी, अन्यथा सीतामढीतील मातीचा लेप लावून मी चितेवर बसेन आणि आत्मदहन करेन असे त्यांनी जाहीर केले. संघ, भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या कूटनीतीमुळेच अयोध्येत राममंदिराची उभारणी होत नाही असा आरोप दास यांनी केला.




























































