लोकसभा निवडणुकीत मतदान अतिशय संथगतीने झाले होते. आता विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या लक्षात घेता प्रत्येक मतदाराला मतदानासाठी किमान तीन ते चार मिनिटांचा अवधी लागणार असून मतदान केंद्रांच्या बाहेर रांगा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या कमी ठेवावी. तसेच दुबार मतदानाला आळा घालण्यासाठी मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्यात (लिंक) यावे, अशी मागणी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली
शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली आणि मागण्या व सूचनांचे निवेदन दिले.
दुबार मतदानाला आळा
निवडणूक प्रक्रियेतील गंभीर दोष हटवण्यासाठी सर्व मतदारांची ओळखपत्र आधारकार्डशी जोडावी. जर रेशन कार्ड, पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडले जाते तर मतदान कार्ड का जोडले जाऊ शकत नाही? बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी दुबार नावांची संगणकीय नोंद करावी. त्यामुळे दुबार मतदान झाले तर दुबार नाव असलेल्या केंद्रावर तत्काळ संदेश पाठवून दुसऱ्यांदा होऊ शकणारे मतदान रोखावे.
मतदारांना सुविधा गरजेच्या
रांगेतील सर्व मतदारांना बसण्याची सोय करावी, वृद्ध, अपंग मतदारांसाठी विशेष सोय करावी. पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रामध्ये रॅम्प, लिफ्टची सोय करावी, पिण्याचे पाणी, टॉयलेटची सोय करावी, मतदारांसाठी सूचना फलक मोठय़ा अक्षरात लावाव्यात, केंद्रात मोबाईल पह्न नेण्यास बंदी असेल तर मोबाईल ठेवण्याची सोय करावी.
मतदान केंद्रे वाढवा
प्रत्येक मतदान केंद्रावर सुमारे बाराशे ते सोळाशे मतदार आहेत. साठ टक्के मतदान गृहीत धरले तर प्रत्येक मतदारासाठी फक्त 39 सेकंद इतकाच वेळ मिळेल. मतदाराचे नाव पुकारणे, ओळख पटवणे, सही, बोटाला शाई, प्रत्यक्ष मतदान ही प्रक्रिया 39 सेकंदांत पूर्ण कशी होणार? प्रत्येक मतदाराला मतदानासाठी तीन ते चार मिनिटे लागतात. यामुळेच मोठय़ा रांगा लागतात. रांगा बघितल्यावर मतदार निरुत्साही होतात. हेच मतदान कमी होण्याचे कारण आहे. त्यामुळे मतदान केंद्रे वाढवून प्रत्येक बूथवरील मतदारांची संख्या आटोपशीर ठेवावी.
मतदान यंत्राची बॅटरी
मतदान यंत्राच्या बॅटरीमधील इंडिकेटर मतदान सुरू होण्याची तारीख, वेळ, बॅटरीचा कोड नंबर आणि मतदान सुरू करताना व बंद होताना बॅटरी किती चार्ज आहे याची नोंद पोलिंग एजंटला देण्यात येणाऱया फॉर्म-17 मध्ये करावी.
शिक्षकांशी अरेरावी नको
महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकारी हे शिक्षकांशी अत्यंत उर्मटपणे वागतात. तुम्हाला तुरुंगात पाठवू, दंड ठोठावू अशा धमक्या शिक्षकांना खासकरून महिलांना देण्यात येतात. त्याबाबत सक्त सूचना द्याव्यात.
z मतदान कसे व कोणत्या पद्धतीने करावे याच्या सूचना मतदारांना दिसतील अशा पद्धतीने लावाव्यात.
z मतदान केंद्रावर मोबाईल फोन नेण्यास बंदी असेल तर मोबाईल सुरक्षित ठेवण्याची सोय करावी.
z प्रत्येक कामासाठी वेगवेगळे निवडणूक अधिकारी नेमावेत. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे काम शिपाई, पोलीस यांना न देता मतदार रांगा नियमन करणे, मतदारांना सोयी देण्याची कामे त्यांना द्यावीत यासाठी मतदान अधिकारी वाढवावेत.