
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आक्रमक उपनेत्या सुषमा अंधारे भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. तसेच त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत त्यांची बोलती बंद करत आहेत. त्यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी अंधारे यांच्यावर टीका केली आहे. तुम्ही तुमचे नाव सुषमा अंधारेंऐवजी सुषमा आगलावे करा, असा शेलार अंधारे यांना म्हणाले आहेत. त्यावर सुषमा अंधारे यांनी शेलार यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
राज्याच्या राजकारणात स्थान निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्ये तुम्हाला करावी लागत आहेत. स्वत:च्या पक्षाची वाताहत झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात कलह निर्माण करण्यासाठी आगलावेपणा बरा नव्हे. तुमच्याकडून ही अपेक्षा नाही, असेही शेलार यांनी अंधारे यांना म्हटले आहे. त्याचा सुषमा अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
आम्ही आगलावे असू तर हवेत गोळीबार करणारे सदा सरवणकर कोण आहेत? जे प्रकाश सुर्वे हातपाय तोडण्याची भाषा करतात, जे संजय गायकवाड ‘चून चून के मारेंगे’ म्हणतात, आम्ही हिशोब चुकता करू, अशी जाहीर गुंडांची भाषा तानाजी सावंत करतात, या सर्वांना काय उपाधी द्याल?, असा प्रतिप्रश्न अंधारे यांनी शेलार यांना केला आहे. गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार निव्वळ मवाल्यांसारखी भाषा करतात, हे नेते कोण आहेत, असा सवाल करत अंधारे यांनी शेलार यांना प्रत्युत्तर दिले आहे.


























































