
राज्यात कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे. बुधवारी दिवसभरात एकूण 19 हजार 163 जण कोरोनामुक्त झाले असून आता कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्या 10 लाख 88 हजार 322 वर पोहचली आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभरात एपूण 18 हजार 317 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आली आहे.
आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण 67 लाख 85 हजार 205 जणांची चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी एकूण 13 लाख 84 हजार 446 जणांना कोरोनाची लागण झाली असून हे प्रमाण 20.40 टक्के इतके असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. दिवसभरात कोरोनामुळे एकूण 481 जणांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.65 टक्के इतका आहे. सध्या राज्यात कोरोनाचे एकूण 2 लाख 59 हजार 033 ऑक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यभरात 21 लाख 61 हजार 448 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 29 हजार, 187 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आल्याचे आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
मुंबईत दिवसभरात 2,654 कोरोना रुग्ण
मुंबईत बुधवारी दिवसभरात 2,654 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत एकूण 2,066 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 1 लाख 69,268 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 46 जणांचा मृत्यू झाला.
मुंबईत 46 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 8 हजार 926 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 66 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 26 हजार 540 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 11 लाख 15 हजार 711 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 5 हजार 142 वर पोहोचली आहे.


























































