
पार्सल कुरियरमध्ये ड्रग असल्याच्या भूलथापा मारून कारवाईच्या नावाने पैसे उकळणाऱ्या इंजिनीअरला अखेर मुंबई सायबर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. कृषाल माळी असे त्याचे नाव आहे.
माळीच्या अटकेसाठी पोलिसांनी नाशिक येथे फिल्डिंग लावली होती. त्याने फसवणूक करण्यासाठी 43 सिमकार्डचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे.
तक्रारदार महिला पश्चिम उपनगरात राहते. 8 जानेवारीला तिला एक फोन आला. बोलणाऱ्याने आपण फेडेक्स कुरियरमधून बोलतोय असे भासवले. तैवान या देशात पाठवलेल्या कुरियरमध्ये ड्रग आहे. त्याचा तपास मुंबई पोलीस आणि सीबीआयचे अधिकारी करत आहेत. हे प्रकरण मिटवायचे असल्यास पैसे द्यावे लागतील असे सांगून माळीने 14 लाख 36 हजार रुपये उकळले. पैसे दिल्यानंतर माळी आणखी पैशांची मागणी करू लागला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. पोलीस उपायुक्त डॉ. बाळसिंग राजपूत यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे, पोलीस निरीक्षक मंगेश मजगर, सहायक निरीक्षक अमित उतेकर यांच्या पथकाने तपास सुरू केला.
ज्या खात्यात पैसे जमा झाले, ते खाते नाशिक येथील असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी नाशिक येथे फिल्डिंग लावली. माळी हा सतत त्याचा राहण्याचा पत्ता बदलत होता. त्यामुळे त्याला पकडणे कठीण होते. अखेर पोलिसांनी माळीला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 43 सिमकार्ड जप्त केले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
मेसेज करून फोन करायचा बंद
माळी हा इंजिनीअर असून सध्या तो बेरोजगार आहे. फसवणूक करण्यासाठी तो नाशिक येथील निर्जन स्थळी जायचा. दिवसभर तो बनावट सिमकार्डचा वापर करून फसवणूक करायचा. सायंकाळी घरी येताना तो फोन बंद करून ठेवायचा. नोकरी सुटल्यावर झटपट श्रीमंत होण्यासाठी माळीने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्या विरोधात कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
























































