
राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना विविध सेवा एका डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘महा-उपलब्धी’ (महाराष्ट्र युनिफाइड पेन्शन लाभ डिजिटल हब अँड इन्फॉर्मेशन) अॅप विकसित केले आहे. हे अॅप येत्या 1 जुलैपासून कार्यान्वित होणार असून, या अॅपटॉपद्वारे निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध माहिती आणि सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील.
राज्यातील अनेक निवृत्तीवेतनधारकांना मासिक निवृत्तीवेतनाचा तपशील, आयकर कपात दाखला (फॉर्म-१६), उत्पन्नाचा दाखला, शासन निर्णय आदी माहितीसाठी कोषागार कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष जावे लागत होते. ज्येष्ठ नागरिकांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी हे अॅप विकसित करण्यात आले आहे. निवृत्तीवेतनाशी संबंधित माहिती जलद आणि अचूक मिळणार असून, यामुळे कोषागार, अधिदान आणि लेखा कार्यालयांना भेट देण्याची आवश्यकता भासणार नसल्याचा सरकारचा दावा आहे.
पहिल्या टप्प्यात उपलब्ध होणाऱ्या सेवा:
पहिल्या टप्प्यात निवृत्तीवेतनधारकांना २०२४-२५ पासूनच्या मासिक आणि वार्षिक निवृत्तीवेतनाचा तपशील पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे उत्पन्न प्रमाणपत्र, ईपीपीओ (e-PPO), ईसीपीओ (e-CPO) आणि ईजीपीओची (e-GPO) प्रत ऑनलाईन मिळणार आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ पासूनचा आयकर कपात दाखला, फॉर्म ‘ए’ आणि फॉर्म ‘बी’ देखील ऑनलाईन अॅपद्वारे मिळेल.
दुसऱ्या टप्प्यात ऑनलाईन हयातीचा दाखला आणि ऑनलाईन निवृत्तीवेतन तक्रार निवारण प्रणाली सुरू होईल.




























































