काळ्या फिती लावून मंत्रिमंडळाकडून निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jayant-patil

सीमाभागात मराठी बांधावांवर कर्नाटक सरकारच्या सुरू असलेल्या दडपशाहीविरोधात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी काळ्या फिती लावून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला. मंत्र्यांनी दंडावर काळ्या फिती बांधून दिसभराचे कामकाज केले. महाराष्ट्राची जनता सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. संपूर्ण सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात येईल, असा विश्वास महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून व्यक्त करण्यात आला.

सीमाभागातील मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारचा अन्याय सुरूच आहे. या अन्यायाला वाचा पह्डण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी रॅली काढून dनिषेध नोंदवला जातो. मात्र यंदा ही रॅली काढण्यासही सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. या दंडेलशाहीविरोधात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आज दिवसभराचे कामकाज काळ्या फिती लावून केले. कर्नाटकातील व्यावसायिकांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची भेट घेऊन आपले गार्हाणे त्यांच्यासमोर मांडले.

शिवसैनिकांनीही बांधल्या काळ्या फिती

नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांची मूळचे कर्नाटकातील असलेल्या ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी भेट घेतली. यावेळी कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवतानाच सीमाभाग लवकरात लवकर महाराष्ट्रात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी या व्यापाऱयांना पाठिंबा दर्शवतानाच कर्नाटकचे सरकार तेथील मराठी माणसांवर जो अन्याय करीत आहे त्याचा महाविकास आघाडी सरकार निषेध करीत असल्याचे सांगितले. शिवसैनिकांनीही काळ्या फिती बांधून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला. त्याचप्रमाणे व्हॉटस् अॅप, फेसबुकच्या माध्यमातूनही कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध व्यक्त करताना तेथील मराठी बांधावांना पूर्ण पाठिंबा दर्शविला.

बेळगाव, कारवार, निपाणीसह ‘संयुक्त महाराष्ट्र’ हाच निर्धार

सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांच्या लढ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पाठिंबा दिला. बेळगाव, कारवार, निपाणीसह ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा आपला निर्धार आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी देत असलेल्या लढय़ाला महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा आहे. सीमाभागातील मराठी बांधवांच्या संघर्षाला मी देखील जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. मराठाभाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय हा संग्राम थांबणार नाही, असा विश्वास देतो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!

बेळगावमधील सीमावासीयांनी पाळलेल्या ‘काळा दिन’ या आंदोलनात महाराष्ट्र सरकारमधील सर्व मंत्री सहभागी आहेत. बेळगाव, कारवार, भालकी, बिदर, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी व्यक्त केले. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांवर शिवसेना मोठा संघर्ष करीत आहे. या लढय़ासाठी जे जे हुतात्मे झालेत, त्यांना अभिवादन करून बेळगाववासीयांचा लढा केवळ त्यांचा नसून, संपूर्ण जगातल्या मराठी भाषकांचा आहे, असे डॉ. गोऱहे यांनी सांगितले.

सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. बेळगावसह सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात सामील होईल. – जयंत पाटील, जलसंपदामंत्री