नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना हजेरीची सक्ती नाही, शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षण विचारात घेऊनच नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. विद्यार्थ्यांवर शाळेत हजर राहण्यासाठी कोणतीही सक्ती नसून पालकांचे संमतीपत्र घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा अशा सूचना शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.

राज्यात 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होणार आहेत. शाळा भरवताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना याआधीच राज्य सरकारने जाहीर केल्या असून या सूचनांचे पालन होते आहे की नाही याची तपासणी संबंधित अधिकारी करणार आहेत. शाळा सुरू झाल्यावर चाळीस मिनिटांच्या चार तासिका घेण्यात येणार असून शाळेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक आहे.

यंदा बोर्डाच्या परीक्षा उशिराने

यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व शिक्षणतज्ञांच्या सल्ल्यानुसार घेण्यात येणार असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. परिस्थिती पाहता यंदा बोर्डाच्या परीक्षा उशिराने होतील. विदर्भातील ऊन, कोकणातील पाऊस व इतर जिह्यांतील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच मे महिन्याच्या सुरुवातीला परीक्षा होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे लक्षात ठेवा…

  • स्थानिक प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, व्यवस्थापक व सरकार यांच्या सामुदायिक जबाबदारीवर एक दिवसआड शाळा भरेल.
  • शाळांचे, वाहनांचे निर्जंतुकीकरण आवश्यक. जेवणाची सुट्टी नाही.
  • विद्यार्थ्यांनी शालेय वस्तूंची इतरांसोबत अदलाबदल करू नये.
  • ऑनलाइन शिक्षणात शिकवलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी, शंका समाधान व नवा विषय प्रत्यक्ष वर्गात शिकवला जाईल.
  • एका दिवशी वर्गातील 50 टक्के विद्यार्थ्यांनाच बोलवावे.