मी निष्ठा शिकवली तर बिघडलं कुठे… शिंदे गटाच्या प्रश्नाला सुषमा अंधारे यांचं सडेतोड प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुमारे तीन महिन्यांपूर्वी सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. तेव्हापासून त्या पक्षाची भूमिका जोरदारपणे मांडत आहेत. या आठवड्यापासून त्यांची महाप्रबोधन यात्रा सुरु झाली आहे. गुरुवारी ही यात्रा नवी मुंबईत पोहोचली आहे. या यात्रेतही सुषमा अंधारे यांनी तुफान भाषण करत शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. तसेच त्यांच्या प्रश्नाला सडेतोड प्रत्युत्तरही दिले. त्यांच्या भाषणाला शिवसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्या सुषमा अंधारे आम्हाला हिंदुत्व आणि निष्ठा शिकवणार का? असा प्रश्न शिंदे गटातील आमदार सातत्याने विचारत आहेत. शिंदे गटाच्या याच प्रश्नाला सुषमा अंधारे यांनी आज जोरदार आणि सडेतोड प्रत्युत्तर दिलं. त्यांच्या या उत्तरानंतर शिवसैनिकांनी टाळ्यांचा गजर केला. शिवतीर्थावरील भाषणानंतर आणि ठाण्यातील फटकेबाजीनंतर आजही सुषमा अंधारे यांनी ही सभा गाजवली.

शिंदे गटातील लोक म्हणतायेत, तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्या सुषमा अंधारे आम्हाला निष्ठा आणि हिंदुत्व शिकवणार का? मला त्यांना सांगायचंय, भलेही मी आधी शिवसेनेत नसेल पण संकटकाळात मी शिवसेनेत आले. तुम्ही 30 वर्ष सत्ता भोगली, आमदार-खासदार झाले. पण अडचणीच्या काळात सोडून गेले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संकटात असताना मी तुमच्यासारखी पळून गेलेली नाही. अन् मी निष्ठा शिकवली तर बिघडलं कुठे.. कधी कधी आजोबाला नात शिकवत असते…, असे सडेतोड प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला दिले.

‘आम्हीच खरे बाळासाहेबांचे वारसदार’, असे म्हणणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांचा अंधारेंनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. गणेश नाईक-बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा सांगत त्यांनी शिंदे गटातील नेत्यांवर टीका केली. त्या म्हणाल्या, गणेश नाईक शिवसेनेत होते त्यावेळी ते अवैध पद्धतीने खाणी खोदत आहेत, हे जेव्हा बाळासाहेबांना कळलं, तेव्हा त्यांनी गणेश नाईकांना खडसावलं. पर्यावरणाचं संवर्धन झालं पाहिजे, यासाठी त्यांनी गणेश नाईकांची कानउघाडणी करत अवैध पद्धतीने खाणी खोदणे बंद करा, असा दम दिला. आताही शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आरेच्या आंदोलनात पुढाकार घेत होते, तेव्हा ते एकप्रकारे बाळासाहेबांचा विचारच पुढे नेत होते. हे तरी शिंदे गटातील लोकांना कळलंय का…असा सवालही त्यांनी केला.