अन्याय करणारे मोदी सरकार उखाडल्याशिवाय स्वस्थ बसू नका; राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत झाला. राहुल गांधी यांनी रविवारी सकाळी दक्षिण मुंबईतील मणीभवनपासून न्याय संकल्प यात्रा काढली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी होते. हिंदुस्थान हा प्रेमळ देश आहे. मात्र, आपल्या देशात भाजप द्वेष पसरवत आहे. असा द्वेष का पसरवण्यात येत आहे. देशात दररोज गरीब, दलित, महिला आणि तरुणांवर अन्याय होत आहे, अशा शब्दांत राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

भारत जोडो न्याय यात्रेची सांगता झाली आहे. मात्र, हा अंत नसून आरंभ आहे. या यात्रेत आपण प्रत्येक वर्गावर होणारा अन्याय पाहिला आहे आणि जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. देशवासियांच्या मनात असलेले स्वप्न सोबत घेऊन मी पुढे जात आहे, असे राहुल गांधी म्हणाले. देशातील प्रत्येकाला आज न्याय हवा आहे. प्रत्येक वर्गासाठी काँग्रेसने 5 न्यायाची घोषणा केली आहे. हीच आपल्या देशाला संजीवनी ठरणार आहे. अन्याय करणाऱ्या आणि द्वेष पसरवणाऱ्या मोदी सरकाला उखाडल्याशिवाय आता स्वस्थ बसू नका, असे आवाहनही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले.

आम्ही जनतेशी संबधित मुद्द्यांवर निवडणुकीला समोरे जात आहोत. तरुण आणि महिलांना रोजगाराचा अधिकार, शेतकऱ्यांच्या मालाला हमभाव, श्रमिकांना सन्मान आणि वंचितांना त्यांचे हक्क देणारे सरकार असावे, ही आमची प्राथमिकता आहे. त्यासाठी आता न्यायाच्या मशाली पटवण्याची गरज आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.