दिवाळीत पावसाचीही सुट्टी, पिके आडवी करून मान्सूनचे पॅकअप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उभी पिके आडवी करून बळीराजाला चिंतेत टाकणारा पाऊस अखेर दीर्घ रजेवर गेला आहे. मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतली, अशी अधिकृत घोषणा हवामान विभागाने आज केली. दरम्यान, यंदाच्या दिवाळीत पाऊस नसेल हेसुद्धा यामुळे स्पष्ट झाले आहे.

पावसाने जून ते ऑक्टोबर असा चार महिने मुक्काम केल्याने गेल्या बारा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद यंदा राज्यात झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांत या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासांत कोकणातील एक-दोन ठिकाणे वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद नाही. दरवर्षी सप्टेंबरअखेरीस मान्सून राज्यातून बाहेर पडतो. यंदा हादेखील विक्रम मोडून मान्सून 23 ऑक्टोबरला राज्यातून बाहेर पडला आहे. संपूर्ण देशातून मान्सून बाहेर पडल्याची घोषणा हवामान विभागाने केली.