राज्यात सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअस; कडाक्याच्या उन्हाने होरपळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असताना वातावरणात कमालीचा उकाडा वाढला आहे. मुंबईसह राज्यांतील अनेक शहरांचे सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास गेले आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाने अंगाची होरपळ सुरू आहे. मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांत तापमानातील चढउतार पाहायला मिळत आहे. सकाळी, दुपारी उकाडा आणि रात्री अवकाळी पावसाचा कडाका बसत आहे. हवेचा कमी दाब आणि उत्तरेतील पावसामुळे राज्यातील वातावरणात चढउतार होत असल्याचा हवामानतज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे नाशिकसारख्या फळभाजी बागा, द्राक्षबागा असलेल्या ठिकाणी शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भरउन्हाळ्यात शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यानंतर काही वेळाने पुन्हा उन्हाचा कडाका वाढल्याने जीवाची काहिली सुरू झाली.