
आता तुम्ही कामाला लागा, 2023 मध्ये निवडणूका लागणार म्हणजे लागणारच, असा दावा करत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले आहे. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच विद्यमान सरकार कोसळेल असे भाकित त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या सरकारमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षामुळेच सरकार कोसळेल असेही अंधारे यांनी म्हटले आहे. भाजपामध्येच सध्या धुसफूस असल्याने सरकार कोसळेल असा दावा अंधारे यांनी केला आहे.
कर्जतमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेदरम्यान सुषमा अंधारे बोलत होत्या. अंधारे यांनी विद्यमान सरकार कोसळणार असल्याचा दावा केला. या मागील कारण काय असेल याबद्दल सांगताना त्यांनी भारतीय जनता पार्टीमधील अनेकजण शिंदे गटाला दिल्या जात असलेल्या महत्त्वामुळे अस्वस्थ असल्याचे सांगितले. हे सरकार पडणार असे मी म्हटले की काही लोक विचारतात ताई कशावरुन म्हणताय? तर मी काही भविष्य सांगणारी नाही पण माझ्याकडे ठोस कारणे आहेत. मी अभ्यास करुन बोलते, हवेत बोलत नाही. अडचण अशी आहे की भारतीय जनता पक्षामध्येच प्रचंड धुसफूस सुरु आहे, असे अंधारे यांनी सांगितले.
शिंदे गटाबरोबर सत्तेत असताना भाजपाचे आपल्याच नेते आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे अंधारे म्हणाल्या. मी जसं म्हटलं तसं बाहेरच्या लेकरांना आंगडं-टोपडं, त्यांचेच वाढदिवस साजरे होत आहेत. घरची लेकरं उपाशी राहिलेली आहेत. बाहेरचीला बनारसी आणि घरची उपाशी अशी त्यांची (भाजपावाल्यांची) अवस्था झालेली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.


























































