यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या 98 टक्के पाऊस होणार, कृषी हवामानतज्ञांचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या मान्सून हंगामात महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या 98 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र वाऱ्याचा ताशी वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी सर्व ठिकाणी कमी आढळल्याने पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये सरासरी 100 टक्के म्हणजे 566 मिलीमीटर पाऊस बरसण्याची शक्यता आहे, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी पत्रकार परिषदेत वर्तवला. राज्यात काही दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ मोठे खंड अशी परिस्थिती राहील, असे ही त्यांनी सांगितले.

डॉ. साबळे म्हणाले, सततचे हवामान बदल, हरितगृह वायूंचे वाढते प्रमाण, बेसुमार सुरू असलेल्या जंगलतोड, तसेच युद्ध परिस्थितीमुळे मान्सूनच्या स्वरूपात सातत्याने बदल होत आहे. यंदा राज्यात मान्सून सरासरीच्या जवळपास बरसण्याची शक्यता असली तरी, पावसात खंड पडण्याचा अंदाज आहे.

 यंदा शेतकऱ्यांना योग्य नियोजन गरजेचे

यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेरण्या कराव्या का नाही, अशा संभ्रमात शेतकरी सापडला आहे. मात्र सध्याच्या तापमानाचा अंदाज पाहता ‘एल निनो’चा प्रभाव अद्याप पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र यंदाच्या मान्सूनच्या पावसात मोठे खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेरणीची घाई न करता चांगला पाऊस झाल्याशिवाय, जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय शेतकऱयांनी पेरण्या करू नयेत तसेच शेतकऱ्यांनी कमी कालावधीच्या पिकांचे उत्पादन घेण्यावर भर द्यावा. ज्वारी, बाजरी, मूग, मटकी, उडीद, चवळी यासह अन्य कमी कालावधीच्या पिकांची निवड करावी. तसेच शेतकऱयांनी ठिबक सिंचनाचा वापर करावा, असा सल्ला ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.

राज्यात कोठे किती पाऊस?

यंदा पश्चिम विदर्भात अकोला येथे सरासरीच्या 97 टक्के म्हणजे 665 मिलीमीटर, तर मध्य विदर्भात नागपूर येथे सरासरीच्या 100 टक्के म्हणजे 958 मिलीमीटर, तर यवतमाळ येथेदेखील सरासरीच्या 100 टक्के म्हणजे 882 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ विभागात चंद्रपूर व भंडारा येथे सरासरीच्या 96 टक्के म्हणजे 1132 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. मराठवाडा विभागात परभणी येथे सरासरीच्या 100 टक्के म्हणजे 815 मिलीमीटर, कोकण विभागात दापोली येथे सरासरीच्या 100 टक्के म्हणजे 3339 मिलीमीटर, उत्तर महाराष्ट्रात निफाड, नाशिक येथे सरासरीच्या 98 टक्के म्हणजे 422, धुळे येथे 94 टक्के म्हणजे 432, जळगाव येथे 96 टक्के म्हणजे 618 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे येथे सरासरीच्या 100 टक्के म्हणजे 566, कोल्हापूर 96 टक्के म्हणजे 643, कराड 97 टक्के म्हणजे 549, पाडेगाव 98 टक्के म्हणजे 353, सोलापूर 96 टक्के म्हणजे 522, राहुरी 99 टक्के म्हणजे 400 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे, असा अंदाज डॉ. साबळे यांनी वर्तवला आहे.