अभ्यासाची पद्धत बदलणार, पुस्तकांना वह्यांची पानं जोडणार – शिक्षणमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केरळ राज्य मॉडेल आधरित शिक्षण पद्धती महाराष्ट्रात राबविण्याबाबतचे सुतोवाच केले आहे. देशभरात शिक्षण क्षेत्रात ज्या राज्यांनी प्रगती केली आहे, अशा राज्यात आमच्या शिक्षण विभागाने दौरे केले. त्यात केरळने अनेक प्रयोग शिक्षण विभागात केल्याची माहिती मिळाली. शिक्षण क्षेत्रात केरळने अनेक उपक्रम राबवले आहेत. यातील जे मॉडेल यशस्वी झाले आहेत, ते पुढे नेण्यात येणार असल्याचे केसरकर म्हणाले. केरळ आणि महाराष्ट्रशी तशी तुलना करता येणार नाही. केरळ सोबत पंजाब, राजस्थान मधून सुद्धा आम्ही मॉडेल घेणार आहोत. केरळमध्ये शाळा ही ग्रामपंचायतीकडे दिल्या आहेत. त्याच धरतीवर विद्यार्थी फोकस सुधारणा आम्ही राज्यात करणार आहोत, असे ते म्हणाले.

पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी लहान असतात, त्यामुळे त्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात पाठवले जाईल. तिसरी पासून पुढील इयत्तेसाठी परीक्षा घेतल्या जातील. परीक्षा जरी घेतल्या जाणार असल्या तरी 8 वी पर्यंत कोणालाही नापास केले जाणार नाही. आम्ही पुस्तकाला वह्याची पान जोडणार आहोत. पुढील वर्षी पासून असे पुस्तक आणि त्याला वह्यांची पान जोडली जातील. प्रत्येक पुस्तक तीन भागात विभागले जाईल, म्हणजे तीन महिन्याला पुस्तक बदलावा लागेल आणि याच विभागलेल्या पुस्तकाला वह्यांची पाने असतील. त्यामुळे विद्यार्थी सुद्धा झालेला अभ्यास त्याच वह्यांच्या पानावर लिहतील, असेही केसरकर म्हणाले.