त्रिपुराच्या घटनेनंतर महासायबरने केले 36 सायबर बॉम्ब निकामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

त्रिपुराच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. सोशल मीडियावर आक्षेपार्ह ट्विट, फेसबुक, इंस्टाग्रामवर मेसेज करून समाजात तेढ निर्माण करणारे 36 सायबर बॉम्ब महासायबरने वेळीच निकामी केले. आक्षेपार्ह मेसेज पाठवणाऱयांची महासायबरने ओळख पटवली आहे.

त्रिपुराच्या घटनेनंतर सोशल मीडियावरून व्हायरल होणाऱया व्हिडीओ पह्टोमुळे अनुचित घटना घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली. सोशल मीडियावर अफवा पसरवणारे, समाजात तेढ निर्माण करणारे पोस्ट अपलोड करणाऱयावर स्थानिक सायबर पोलिसांप्रमाणेच महासायबरच्या तज्ञांची टीम नजर ठेवून होती. महासायबरच्या टीमने ट्विटरवर आलेले 25, फेसबुकवरचे 6, इंस्टाग्रामचे 5 असे  36 आक्षेपार्ह मजकूर वेळीच हटवले.

यू टय़ूबवर एकही व्हिडीओ नाही 

एखादी घटना घडल्यावर जुने व्हिडीओ नव्या नावाने यू टय़ूबद्वारे सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. भडकावू भाषणे, जाळपोळीचे व्हिडीओ यू टय़ूबवर अपलोड केले जातात. पण या वेळेस यू टय़ूबवर असे कोणतेही व्हिडीओ अपलोड झाले नव्हते. त्रिपुराच्या घटनेनंतर सोशल मीडियावर अफवांचे मेसेज पसरवू नयेत असे आवाहन पोलिसांनी केले होते.

सोशल मीडियावर अफवा पसरवणे हा गुन्हा आहे. त्रिपुराच्या घटनेनंतर आक्षेपार्ह मजकूर वेळीच काढण्यात आले. मेसेज अपलोड करणाऱयांची माहिती महासायबर स्थानिक सायबर पोलिसांना देणार आहे. त्याच्यावर स्थानिक सायबर पोलीस गुन्हे दाखल करणार आहेत.
– यशस्वी यादव, विशेष पोलीस महानिरीक्षक, महासायबर