महाविकास आघाडीचे विधानपरिषद निवडणुकीचे जागावाटप जाहीर; शिवसेना 4, काँग्रेस 8 तर राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागांवर लढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकीत काँग्रेस आठ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तीन जागांवर लढणार आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आज झालेल्या बैठकीनंतर जागावाटप जाहीर करण्यात आले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे व मिलिंद नार्वेकर यांच्यात आज बैठक पार पडली. या विधानपरिषदेच्या 15 जागांवर एकमत झाले असून नांदेड व नाशिक या दोन जागांबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे.

काँग्रेस चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदीया, अमरावती,अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव – बीड, लातूर यांसह नागपूर पोटनिवडणूकीच्या एका जागेवर निवडणूक लढवणार आहे. शिवसेना रत्नागिरी, जळगाव, परभणी- हिंगोली, छत्रपती संभाजीनगर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे, ठाणे, सातारा- सांगली या तीन जागांवर निवडणूक लढणार आहेत.

विधान परिषदेच्या जागे संदर्भात महाविकास आघाडीनेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, मुंबई अध्यक्ष माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे उपस्थित होते.