
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) खासदार दानिश अली यांच्यासह अनेक विरोधीपक्षाच्या नेत्यांनी गुरुवारी संसदेच्या आचारसंहिता समितीच्या बैठकीतून वॉकआउट केलं.
मोईत्रा यांच्याविरुद्धच्या ‘कॅश फॉर क्वेरी’ आरोपासंदर्भात त्या लोकसभेच्या संसदेच्या आचारसंहिता समिती समोर हजर झाल्या होत्या.
दानिश अली यांनी महुआ मोईत्रा यांना विचारलेल्या प्रश्नांचे वर्णन ‘द्रौपदीचं वस्त्रहरण’ अशा शब्दात केलं आणि लोकसभेच्या आचारसंहिता समितीची बैठक ज्या पद्धतीनं आयोजित केली गेली त्याचा निषेध केला.
ते म्हणाले, ‘आचारसंहिता समितीच्या अध्यक्षांनी महुआ मोईत्रा यांना वैयक्तिक प्रश्न विचारले, जे सहन करण्यासारखे नव्हते’.
‘ते अनैतिक प्रश्न विचारत आहेत. ‘तु्म्ही रात्री कुणाशी बोलतात, कशा बोलतात, हे प्रश्न अध्यक्षांनी विचारावेत का? ही अतिशयोक्ती आहे’, असं दानिश अली म्हणाले.
काँग्रेसचे खासदार एन उत्तम कुमार रेड्डी म्हणाले, ‘आम्हाला लोकसभेच्या आचार समितीच्या अध्यक्षांनी महुआ मोईत्रा यांना केलेले प्रश्न चुकीचे आणि अनैतिक वाटले’.
‘सर्व प्रश्नांवरून असे दिसते की ते (संसदेच्या आचार समितीचे अध्यक्ष) कुणाच्यातरी इशाऱ्यावर काम करत आहेत. हे खूप वाईट आहे. दोन दिवसांपासून आम्ही त्यांना काही गोष्टी विचारत आहोत… ते त्यांना (महुआ मोईत्रा) कुठे विचारत आहेत?’, असं काँग्रेस खासदार उत्तम कुमार रेड्डी म्हणाले.
जनता दल (युनायटेड) खासदार गिरीधारी यादव म्हणाले की समितीला महुआ मोईत्रा यांना वैयक्तिक प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही.
























































