माजलगाव न्यायालय इमारतीचे 23 मार्चला उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। माजलगाव

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या माजलगाव न्यायालय इमारतीच्या उद्घाटनास अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या 23 मार्च रोजी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या हस्ते या सुसज्ज दुमजली इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

इमारत तयार होऊन तीन वर्षे उलटले तरीही विविध अर्धवट कामामुळे उद्घघाटनाचा मुहूर्त लागत नव्हता, अखेर सर्व कामे पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर जिल्हा वरिष्ठ न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्याने येत्या 23 मार्च रोजी प्रशासकीय पातळीवर नव्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे.

माजलगाव येथे निजामकालीन अशी न्यायालयाची भव्य अशी वस्तू आहे. त्यामध्येच दिवाणी,फौंजदारी,जिल्हा,तालुका न्यायालय तसेच विधी व सेवा प्राधिकरण आदीचे कामकाज चालते. ही इमारत जुनी व अपुरी पडत असल्याने शासनाने नवीन इमारतीसाठी साडेतीन एकर जागा बायपास रोडवर मंगलनाथ मंदिराशेजारी दिली. या ठिकाणी 2013 मध्ये साडेपाच कोटी रुपये खर्चाची इमारत दोन वर्षांत उभी राहिली.हा निधी अपुरा पडत असल्याने पुन्हा 70 लाख,तसेच फर्निचरसाठी दिड कोटी रुपयांची तरतूद करून आता ही इमारत परिपूर्ण झाली आहे. या दुमजली इमारतीमध्ये सहा कोर्ट हॉल,न्यायमूर्तीसाठी लागून असलेले चेंबर, कोर्ट ऑफिस,वकिलांसाठी दोन बार रूम,सरकारी वकिल यांच्यासाठी कक्ष,कॅन्टीन, स्ट्रॉगरूम,दोन मोठ्या आकाराचे जेल,कर्मचाऱ्यांना स्वतंत्र टॉयलेट,सर्वसामान्य लोकांना , अपंगांना ,महिलांना स्वतंत्र टॉयलेट,तीन पार्किंग व्यवस्था,जनरेटर, बागबगीचा,सुरक्षारक्षक केबिन अशा सर्व सोयी सुविधा या इमारतीत व परिसरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.प्रमुख जिल्हा न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी तीन दिवसांपूर्वी या इमारतीची पाहणी करून अखेर हिरवा कंदील दाखवल्याने आता येत्या 23 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांचे हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.