सिक्कीममध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना; २७ मजूर बोगद्यात अडकले, बचावकार्य सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिक्कीमच्या नामची जिल्ह्यात सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका निर्माणाधीन बोगद्याबाहेर अचानक दरड कोसळल्याने बोगद्याच्या आतमध्ये काम करणारे सुमारे २७ मजूर अडकले आहेत. या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दरड कोसळल्यानंतर बोगद्याचा प्रवेशमार्ग बंद झाला आहे. आतमध्ये अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र बोगद्याच्या आत मिथेन गॅस असण्याची शक्यता असल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.

मिथेन गॅसच्या संभाव्य धोक्यामुळे बचाव मोहिमेचा वेग मंदावला आहे. आतमध्ये प्रवेश केलेल्या काही बचाव कर्मचाऱ्यांचीही गॅसच्या प्रभावामुळे प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.