एटीएम सुरक्षित बनवा, नाही तर कारवाई!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

ग्राहकांचा पैसा सर्व प्रकारे सुरक्षित ठेवण्यासाठी येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत देशातील एटीएम सुरक्षित बनवा नाही तर योग्य ती कारवाई केली जाईल, अशा इशारा रिझर्व्ह बँकेने आज देशभरातील बँका आणि एटीएम ऑपरेटर्सना दिला आहे. एटीएम सुरक्षित झाल्यानंतर पुढील जून २०१९ पर्यंत त्याचे पूरक ‘सिक्युरिटी वर्जन’ही कालबद्ध पद्धतीने लागू करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत.

गेल्या काही वर्षांत अनेक एटीएम घोटाळे समोर आले आहेत. त्यात विविध प्रकारे चोरींनी एटीएममधील रक्कम लांबवल्याचे उघड झाले आहे. मात्र, एटीएम प्रणाली अद्ययावत आणि अधिक सुरक्षित करण्याचे बँकांचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर, आरबीआयने बँकांना फैलावर घेतले आहे. या आधी मार्च २०१७ मध्ये आरबीआयने गोपनीय सर्क्युलर काढून एटीएममध्ये सुरक्षा प्रणाली अधिक सुरक्षित करून सुरक्षा प्रणालीचा आढावा घ्यावा आणि उपाययोजना आखा, असे आदेश दिले होते. देशभरात फेब्रुवारी २०१८ पर्यंत २ कोटी ६ लाख एटीएम असल्याची नोंद आहे.

बँकांना कराव्या लागणार या उपाययोजना
-‘बीआयओएस’ पासवर्ड, डिसएबलिंग यूएसबी पोर्ट, डिसएबलिंग ऑटोरन फॅसिलिटी, ऑपरेटिंग प्रणाली अद्ययावत, सुरक्षेचे उपाय, टाईम बेस ऍडमिन ऍक्सेस या बाबी ऑगस्टपर्यंत पूर्ण कराव्यात, असा आदेश आहे.
-सर्व एटीएममध्ये मार्च २०१९ पर्यंत अँटी-स्किमिंग आणि व्हाईटलिस्टिंग सोल्युशन बसवण्याचे आदेश.
-डिसेंबर २०१८ पर्यंत सर्व ५० टक्के एटीएममध्ये पूरक ऑपरेटिंग सिस्टीम लावावी आणि जून २०१९पर्यंत अद्ययावत करावी.
-जुलै महिन्यापर्यंत बँकांच्या संचालकांनी बैठका घेऊन त्याबाबतचा कृती आराखडा तयार करावा आणि त्याची आरबीआयला माहिती द्यावी.