
सामना प्रतिनिधी। मालवण
मालवण समुद्रात अनधिकृतरीत्या घुसखोरी करून मासेमारी करणारा मलपी येथील एक हायस्पीड ट्रॉलर रविवारी मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेने पकडून मालवण बंदरात आणला. मात्र मत्स्य अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देत या ट्रॉलरने पळ काढल्याने मत्स्य विभागाच्या कारवाई वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही दोन वेळा पकडलेल्या ट्रॉलर्सनी पळ काढल्याच्या घटना घडल्या होत्या. आता पुन्हा पकडलेला ट्रॉलर पळून गेल्याचा प्रकार घडल्याने मच्छिमारांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार देत गुन्हा नोंद करण्यात येणार आहे अशी माहिती सहाय्यक मत्स्य आयुक्त राजकुमार महाडिक यांनी दिली, मात्र सोमवारी दिवसभरात याबाबत कोणतीही तक्रार पोलीस स्थानकात दाखल नव्हती.
मालवण येथील समुद्रात अनधिकृतरीत्या घुसखोरी करून मासेमारी करणारा मलपी येथील एक हायस्पीड ट्रॉलर मत्स्य व्यवसायच्या गस्तीनौकेने रविवारी पकडला होता. गस्तीनौकेवरील मत्स्य व्यवसायचे अधिकारी प्रदीप वस्त यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. रविवारी सायंकाळी उशिरा हा ट्रॉलर मालवण बंदरात आणण्यात आला. या ट्रॉलरवर मोठ्या प्रमाणात मासळी आढळून आली. आज सोमवारी सकाळी या मासळीचा लिलाव करून कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येणार होता.
हा ट्रॉलर मालवण बंदरात आणल्यानंतर त्याच्या बंदोबस्तासाठी मत्स्य विभागाने पोलिसांकडे कर्मचाऱ्यांची मागणी केली. मात्र कारवाई पूर्वी पोलीस संरक्षणाची लेखी मागणी न करता आयत्यावेळी पोलीस बंदीबस्ताची मागणी केल्याने पोलिसांनी त्यास नकार दिला. त्यामुळे मत्स्य अधिकाऱ्यांनी गस्ती नौकेतच थांबून ट्रॉलर वर पहारा ठेवला होता. मात्र रात्रीच्या वेळी या ट्रॉलरवरील तांडेल व मच्छीमारांनी गस्ती नौकेवर असणाऱ्या मत्स्य अधिकाऱ्यांना चकवा देत संधी साधून पोबारा केला.
अनधिकृत मासेमारी करणारे ट्रॉलर्स मत्स्य विभागाने पकडल्यावर सदर ट्रॉलर्स पकडून गेल्याच्या घटना यापूर्वी चार पाच वेळा घडल्या आहेत. आता पुन्हा पकडलेला ट्रॉलर पळून गेल्याने मत्स्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. याबाबत अनधिकृत मासेमारी विरोधात लढा देणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.





























































