मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नव्या पुतळय़ासाठी दोन तांत्रिक समित्या नेमल्या, परंतु पुतळा कोसळला त्याला नेमके कोण जबाबदार? त्याची चौकशी करण्यासाठी सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे? इतकी मोठी दुर्घटना घडली त्याची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींकडून करायला हवी होती. मात्र चौकशीत आपलीच फसगत होईल या भीतीने मिंधे सरकार समिती नेमण्यात टाळाटाळ करत आहे. शिवप्रेमींमध्ये त्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
मालवणच्या राजकोटवरील शिवपुतळा कोसळल्याची जबाबदारी मिंधे सरकार घ्यायला तयार नाही. नौदलावर आरोप केले जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर आरोप केले जात आहेत. जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात आहे. त्यामुळे पुतळा कोसळल्याच्या घटनेला नेमके जबाबदार कोण याची चौकशी होणे गरजेचे आहे. शिवरायांचा पुतळा कोसळणे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत शरमेची बाब असल्याने या दुर्घटनेमागचे गुन्हेगार जगासमोर आले पाहिजेत अशी जनभावना असतानाही मिंधे सरकारने चौकशी समिती नेमलेली नाही.
n दोन तांत्रिक समित्या याप्रकरणी सरकारने नेमल्या आहेत. त्या समित्या केवळ तांत्रिक बाबी तपासणार आहेत. तसेच नव्या पुतळय़ाबाबत शिफारशी करणार आहेत, मात्र पुतळा कोणामुळे कोसळला याची चौकशी या समित्या करणार नाहीत.
n सखोल चौकशी झाली तर यामध्ये मिंधे सरकारबरोबर नौदलाची भूमिका काय होती हेसुद्धा उघड होईल आणि त्याचा थेट संबंध नरेंद्र मोदी सरकारशी जोडला जाईल.
n शिल्पकार आपटे याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आहे म्हणून त्याला पुतळय़ाचे काम मिळाले असाही एक पैलू या प्रकरणामागे आहे. याच उद्देशाने चौकशी टाळली जात असल्याची चर्चा आहे.