
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया मार्फत यावर्षी ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन ३० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत मामा वरेरकर नाटयगृह, मालवण येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराजच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
‘मालवणला मोठी नाट्य परंपरा लाभली आहे. मालवणी नटसम्राट स्व. मच्छीन्द्र कांबळी यांनी मालवणी बोली साता समुद्रापार पोहोचवली. अशा नाट्य संस्कृतीने संपन्न असलेल्या मालवणमध्ये राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र होणे ही मालवणसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे’, असे जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यावेळी म्हणाले आहेत.
उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या कलागुणांमधून व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा, नाट्य कलेचा प्रचार व प्रसार सर्वस्तरातून व्हावा, सांस्कृतिक वातावरण तयार व्हावे हा उद्देश ठेऊन शासन राज्य नाटय स्पर्धांचे आयोजन गेली ५८ वर्ष करीत आहे. या वर्षी ५९ व्या वर्षात राज्य नाट्य स्पर्धा पोहोचली आहे. या स्पर्धेचा आस्वाद घेण्याकरीता व कलावंतांना प्रोत्साहित करण्याकरीता सर्व रसिक प्रेक्षकांनी १० डिसेंबर पर्यंत मामा वरेरकर नाटयगृह, मालवण येथे दररोज सायंकाळी ठिक ७ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी स्पर्धा समन्वयक सौ. श्रेया शिंदे यांनी केले.
































































