जेलमध्ये सुचली बनावट नोटांची आयडिया, भाड्याच्या घरात तयार करायचा नोटा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा तयार करून त्या वितरित करणाऱयाला मालवणी पोलिसांनी अटक केली. हनीफ शेख असे त्याचे नाव आहे. हनीफ हा आर्थर रोड जेलमध्ये होता. तेव्हा त्याला एकाने बनावट नोटा कशा बनवायच्या याची आयडिया दिली होती. पोलिसांनी हनीफकडून 60 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

मालवणीच्या अंबुजवाडी येथे एक जण बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पोलिसांनी पडताळली. सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक शेखर भालेराव यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक नीलेश साळुंखे, हसन मुलाणी, मोरे, पाटील, पवार, राठोड, आव्हाड, कुरबुडे आदी पथकाने अंबुजवाडी येथे सापळा रचला. पोलिसांनी सापळा रचून हनीफला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 200 रुपयांच्या 300 नोटा मिळाल्या. पोलिसांनी हनीफला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून पोलिसांनी संगणक, प्रिंटर, हेअर ड्रायर, पेपर, डिंक, पेन ड्राईव्ह, कार्ड रीडर जप्त केले.

हनीफ हा मीरा रोड रहिवासी आहे. तो पूर्वी इमिटेशन ज्वेलरीमध्ये प्रिंटिंगचे काम करायचा. 2021 मध्ये हनीफविरोधात नागपाडा येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. महिलेची फसवणूक केल्यामुळे तो सहा महिने आर्थर रोड जेलमध्ये होता. जेलमध्ये असताना त्याला एकाने नोटा कशा छापायच्या याची आयडिया दिली. जेलमधून सुटल्यावर हनीफने मीरा रोड येथे दोन भाडय़ाने घर घेतली. भाडय़ाच्या एका घरात तो सकाळी जायचा. तेथे तो सॉफ्टवेअरच्या मदतीने बनावट नोटा तयार करत होता. तो बनावट नोटा या निम्म्या किमतीत विकत असायचा. काही दिवसांपूर्वी हनीफने मालवणी येथे 200 रुपयांच्या बनावट नोटा बनवून त्या विकल्या होत्या.

मालवणी परिसरात जास्त वर्दळ असल्याने तेथे बनावट नोटा कोणाच्या लक्षात येणार नाही असे त्याला वाटले. त्यामुळे त्याने 60 हजार रुपयांच्या नोटा बनवून त्या विक्रिस आला होता. हनीफला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. बनावट नोटांसाठी लागणारे कागद, सॉफ्टवेअर त्याला कोणी दिले याचा तपास मालवणी पोलीस करत आहेत.